देवांचा देव म्हणून ओळखल्या गेलेल्या ‘महादेवा’च्या जटेतून गंगा बाहेर पडली. त्यामुळे गंगा नदीला आपल्याकडे पुराणात फार महत्त्व आहे. या नदीला धार्मिक संदर्भ असल्याने पाप धुणारी ती गंगामाई म्हणत जो तो गंगा नदीत डुबक्या मारत असतो. पण, आख्यायिकांमधून गंगा नदी पुजली गेली असली तरी प्रत्यक्षात या नदीचे पाणी प्रदूषणाने काळे झाले आहे. आपण ज्या पवित्र, सुंदर गंगा नदीबद्दल बोलतो, ऐकतो ती हीच का?, असा प्रश्न गंगेचे पाणी पाहून पडतो. या गंगा नदीला प्रदूषणापासून वाचवण्याचा एक प्रयत्न म्हणून ‘लाइफ ओके’ वाहिनीने महादेव गंगा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
‘लाइफ ओके’वर सध्या ‘देवों के देव महादेव’ ही मालिका लोकप्रिय आहे. भगवान शंकराची कथा सांगणारी एकही मालिका आजवर कोणी केली नव्हती. त्यामुळे महादेवला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेच्या निमित्ताने गंगा नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक उपक्रम राबवता येईल, या उद्देशाने ‘महादेव गंगा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हरिद्वारमधील गंगेच्या घाटावरून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून चार वेगवेगळ्या पध्दतींनी व्यापक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती वाहिनीचे व्यवस्थापक अजित ठाकूर यांनी दिली.
गंगा नदीचे महत्त्व समजावून सांगण्यापासून प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल याच्या उपाययोजनांची माहिती या उपक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. यासाठी संवाद या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांना गंगा नदी, तिचे भौगोलिक महत्त्व आदींची माहिती देण्यात येणार आहे. मोहल्ला किंवा डीटीडी या उपक्रमांतर्गत विविध मोहल्ला समित्यांच्या बैठका घेण्यात येणार असून घराघरांत जाऊन प्रचार केला जाणार आहे. तर घाट संपर्क उपक्रमात विविध नद्यांवरचे घाट, तेथील परिसराची स्वच्छता आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहिनीच्या सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा