ठाणे महापालिकेने आपल्या अग्निशमन विभागातील सोयी-सुविधांमध्ये मोठे बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार वागळे इस्टेट, मुंब्रा आणि ओवळा भागात नव्या इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दिवा तसेच या भागातील ३२ गावांचा ठाणे महापालिकेत समावेश झाल्याने या परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार असून या सर्व प्रकल्पांसाठी सुमारे ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिवा तसेच आसपासच्या भागात एखादी आग लागल्यास यापूर्वी मुंब््रयातून मदत पाठवावी लागत असे. दिव्याचे स्वतंत्र केंद्र सुरू झाल्यास येथील रहिवाशांना सोयीचे ठरणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा खाडीपलीकडे मुंब्रा या ठिकाणी एकमेव अग्निशमन केंद्र आहे. या केंद्राची इमारत तब्बल २२ वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून ती कमकुवत झाल्याचा अहवाल अभियांत्रिकी विभागास प्राप्त झाला आहे. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा या सगळ्या परिसरासाठी या ठिकाणी चार फायर इंजिने ठेवण्यात आली असून या केंद्राचा विस्तार करण्याची आवश्यकता वेळोवेळी व्यक्त झाली आहे. याशिवाय घोडबंदर परिसराचा आवाका लक्षात घेता ओवळा परिसरात जुन्या केंद्राचे आधुनिकीकरण करावे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव होता. या पाश्र्वभूमीवर महापालिका हद्दीतील तीन केंद्रांचे आधुनिकीकरण आणि दिवा येथे नवे केंद्र सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंब्रा, वागळे आणि ओवळा या परिसरातील अग्निशमन केंद्राच्या इमारतींच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल २५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून दिवा येथे नवे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरासाठी सध्या एकमेव केंद्र अस्तित्वात असून त्यामुळे या भागात नवे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून विचाराधीन होता. शिळफाटा येथे नवे केंद्र उभारण्यासाठी सुमारे १३२४ तसेच ११०० चौरस मीटरचे भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून या दोन्ही भूखंडांचे एकत्रीकरण करून त्यावर नवे केंद्र उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी सहा मजल्यांचे कर्मचारी निवासस्थान उभारले जाणार असून ओवळा, वागळे इस्टेट तसेच मुंब्रा येथे नव्या कर्मचारी वसाहती उभारल्या जाणार आहेत.

Story img Loader