नागपूर विद्यापीठातील नवा प्रताप उघड
नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचा दर्जा किती घसरला आहे, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. विद्यापीठाने अपात्र ठरवलेल्या महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना ‘सेशनल मार्क्‍स’ दिल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या ठिकाणी एकही शिक्षक नसल्यामुळे त्यांची नावे विद्यापीठाने बंदी घातलेल्या महाविद्यालयांच्या यादीत आली, अशा महाविद्यालयांच्या अध्यक्ष आणि सचिवांनीही स्वत:च्या स्वाक्षरीने सेशनल मार्क्‍स दिल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून उघड झाल्याने आधीच बदनाम होत असलेल्या विद्यापीठाच्या अपकीर्तीमध्ये भर पडली आहे.
हा गैरप्रकार विशेषत: तीन वर्षांत, म्हणजे २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत सुरू होता, असे सुनील मिश्रा यांनी केलेल्या विचारणेच्या उत्तरात विद्यापीठाचे सहायक कुलसचिव (गोपनीय) रमण मदने यांनी कळवले आहे. महाविद्यालयांच्या या यादीत माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे व्हीएमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणारा येथील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, वर्धा येथील बाबुराव अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भद्रावती येथील श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे.
परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी या घडामोडींबाबत आश्चर्य व्यक्त केले. केवळ मान्यताप्राप्त शिक्षकच प्रात्यक्षिक किंवा सत्र परीक्षा घेऊ शकतो आणि अंतर्गत किंवा बाह्य़ परीक्षक म्हणून गुण देऊ शकतो. एखाद्या संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव हे पात्र असतील तरी शैक्षणिक अधिकारी नसल्याने त्यांना विद्यार्थ्यांना गुण देण्याची परवानगी नाही. सहसा सत्राचे गुण हे विभागप्रमुख आणि प्राचार्य यांच्या सहीशिक्क्यानेच दिले जातात, असे ते म्हणाले. हा गैरप्रकार थांबवण्यात विद्यापीठाला अपयश आले असल्याकडे लक्ष वेधले असता, हे गुण सहायक कुलसचिव (गोपनीय) यांच्याकडे सीलबंद लिफाप्यात येत असून हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असावा असे ते म्हणाले. गुणांची मोजणी करतेवेळी शिक्षकांच्या उपस्थितीतच हा लिफापा उघडला जातो. त्यामुळे तो तपासला गेला नसावा, असेही त्यांनी सांगितले. यापुढे प्रात्यक्षिक आणि सत्राच्या गुणांवर कडक नजर ठेवण्यात येऊन असे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत अशी हमीही त्यांनी दिली.
विद्यापीठाने मान्यता मंजूर करण्यासाठी वेळ लावल्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचे सांगून व्हीएमआयटीचे संचालक नितीन विघ्ने यांनी या गोंधळासाठी विद्यापीठाला दोष दिला. आमचे माजी प्राचार्य जयंत गांगरेड्डीवार यांनी वडेट्टीवार यांच्याशी काही मतभेद झाल्यामुळे महाविद्यालय सोडले. यानंतर अध्यक्षांनी महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळला. विद्यापीठ इतरांच्या सह्य़ा मान्य करत नसल्यामुळे त्यांनाच सेशनल मार्क्‍सवर सह्य़ा कराव्या लागल्या. त्यावेळी आमच्याकडे नियमित प्राचार्य आणि शिक्षक नव्हते, परंतु आता आमच्याकडे ते पूर्ण क्षमतेने आहेत असे स्पष्टीकरण विघ्ने यांनी दिले.
शिक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे आम्ही महाविद्यालय बंद करत असल्याचे जय महाकाली शिक्षण संस्थेचे सहसचिव सचिन अग्निहोत्री यांनी सांगितले. बाबुराव अग्निहोत्री महाविद्यालय हे आमच्या संस्थेचे सगळयात नवीन महाविद्यालय आहे, परंतु शिक्षकांना वर्धेला राहायचे नाही. इतर महाविद्यालयांमध्येही आम्ही इतर राज्यांतून शिक्षक आणत आहोत असे ते म्हणाले. व्यवस्थापनातील लोकांनी सेशनल मार्क्‍स देण्याबाबत विद्यापीठाला दोष देऊन ते म्हणाले की, त्यांनी तिन्ही महाविद्यालयांतील नियुक्त्या एकत्र (क्लब) करण्यास सांगितले होते व नंतर त्यांनी या नियुक्तयांना मंजुरी दिली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा