अमर चित्रकथा, टिंकल, चंदामामा, चांदोबा, डायमंड कॉमिक्स, इंद्रजाल कॉमिक्स.. १९७०, ८० आणि ९० च्या प्रारंभीचा काही काळ मुलांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या चित्रकथांतील पात्रे आता काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत. एकेकाळी मुलांच्या पिढय़ा न पिढय़ा या चित्रकथांवर पोसल्या आणि घडत गेल्या. उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये मुलांचा दिवस या चित्रकथांशिवाय पूर्ण होत नव्हता. मुलांच्या मित्रांच्या कंपन्यांमध्ये याची देवाणघेवाण चालायची.. क्रिकेट खेळणे किंवा चाचा चौधरी, फँटम, मँड्रेक, सुपांडी, नसीरुद्दीन होजा, कालिया आणि अम्पटीन या चित्रकथेतील पात्रांनी मुलांच्या पिढय़ांना अक्षरश: वेड लावले होते. चित्रकथांच्या प्रकाशकांमध्ये यासाठी तीव्र स्पर्धा राहायची.. परंतु, आता चित्र बदलले आहे. टेलिव्हिन, कंप्युटर गेम्स, मोबाईल गेम्स, इंटरनेटने मुलांच्या आयुष्यात आमुलाग्र क्रांती घडवून आणली आहे. इंटरनेटच्या अतिवेगवान युगात मुलांना चित्रकथा वाचण्यासाठी किंचितही फुरसत मिळत नाही. चित्रकथा वाचण्याच्या मुलांच्या आवडीवर विज्ञान युगाचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे चित्रकथांच्या प्रकाशकांची चिंता वाढली आहे.
मैदानात जाऊन खेळणे आणि वाचन यापेक्षा इंटरनेट, मोबाईलवरील गेम्स खेळण्यात आधुनिक युगातील मुलांची पिढी अधिक रंगू लागली आहे. मुले ‘काऊच पोटॅटो’ बनून टीव्ही, मोबाईल, संगणकापुढे बसून राहू लागली आहेत. चित्रकथांची क्रेझ जवळजवळ संपण्यातच जमा झाली आहे. अमर चित्र कथा आणि टिंकलची विक्री तब्बल ८५ टक्क्यांनी घटली आहे. नव्या पिढीच्या मुलांना चित्रकथांमधील पात्रे माहीत नाहीत. मुलांची कंप्युटर गेम्स किंवा कार्टुन नेटवर्कशी जवळीक वाढली आहे. शाळेत घरी आल्यानंतर मुले टीव्हीसमोर कार्टुन पाहणे सर्वाधिक पसंत करीत असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
कॉमिक्सचा व्यवसाय करणाऱ्या एक अनुभवी विक्रत्याच्या मते संपूर्ण पिढीच्या पिढी कॉमिक्स वाचण्यापासून दूर होत चालली आहे. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल नव्हते तेव्हा एकतर मैदानावर जाऊन खेळणे किंवा कॉमिक्स वाचणे यापलीकडे मुले जात नव्हती. आता काळ बदलला आहे. फँटम, चाचा चौधरी, मँड्रेक्स वाचण्यात मुलांना रस राहिलेला नाही. मुलांचा सर्वागीण विकास, शारीरिक आणि मानसिक वाढ यासाठी इंटरनेट युगातील निकष लावले जात आहेत.
कॉमिक्स वाचण्यातून मुलांचा रस निघून चालल्याची यापलीकडे काही आर्थिक कारणेही आहेत. अमर चित्रकथा हे कॉमिक्स २० वर्षांपूर्वी २० रुपयांना मिळायचे. आता त्याची किंमत ४० रुपयांपर्यंत वाढली आहे. टिंकल १५ रुपयांत मिळायचे ते ३० रुपयांचे झाले आहे. यासाठी पालकांना दोष देता येणार नाही. प्रकाशनाच्या किंमती महागाईमुळे आवाक्यापलीकडे गेल्या असून वाढतच चालल्या आहेत. चलनवाढीचा फटका प्रकाशन व्यवसायाला बसत असून पालकांनी आता कॉमिक्स खरेदीपासून हात आखडता घेतला आहे. कॉमिक्सची अल्पकालीन उपयुक्तता पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची नसल्याने याची खरेदी करण्यापेक्षा मुलांना इंटरनेट, टीव्हीपुढे बसण्याला पालकही प्राधान्य देत आहेत. मोबाईलमुळे संपूर्ण पिढी वेडावली आहे. लहान मुलांनी पर्सनल हँडसेट बाळगणे आता सार्वत्रिक झाले आहे. एफएम रेडिओ, चॅटिंग, इंटरनेट सर्चिग प्रत्येक गोष्ट मोबाईलवर शक्य झाली आहे. त्यामुळे चित्रकथांची क्रेझ आता संपल्यातच जमा झाली आहे.
नफा कमावण्याच्या मागे लागलेल्या शाळा व्यवस्थापनांनी मुलांमध्ये वाचनाची गोडी पुन्हा निर्माण करण्यासाठी विदेशी पुस्तकांऐवजी देशी प्रकाशनांच्या खरेदीवर भर द्यावा, असा एक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, सध्यातरी याची अंमलबजावणी शक्य असल्याचे दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा