साहित्य आणि समाजातून निर्माण होणारी सर्जनशीलता यशवंतराव चव्हाणांमध्ये होती. नवीन पिढी ती हरवत चालली आहे आणि म्हणूनच नव्या पिढीला यशवंतराव समजावून सांगण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. शंकरनगरातील बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे गिरीश गांधी तर व्यासपीठावर रमेश बोरकुटे, डॉ. अक्षयकुमार काळे, अजय पाटील, डॉ. प्रमोद मुनघाटे होते. यशवंतरावांची सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टी यावर भाष्य करताना ते म्हणाले, मूल्यांचे अवमूल्यन होत आहे. नैतिकतेच्या जागी अनैतिकता आली आहे. हे थांबवायचे असेल तर यशवंतरावांचे पुण्यस्मरण करावेच लागेल. साहित्य आणि संतपरंपरेचे संचित घेऊनच यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व साकारले. जगभरातील साहित्य वाचनातून त्यांची सामाजिक दृष्टी व्यापक झाली होती. त्यामुळेच त्यांनी रचलेल्या पायावर आज महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांना असलेला सामाजिक न्यायाचा खरा वारसा यशवंतरावांना मिळाला. ते तमासगिरांच्या दावणीला बसायचे, कारण त्यांना गावकुसाबाहेर वसलेल्या तमासगिरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे होते. प्रकाशकांची नैतिक मूल्ये असतात हे मान्य, पण साहित्य प्रकाशित करताना ते भेदाभेद करत असतील तर यशवंतरावांची साहित्यदृष्टी त्यांनी मातीत मिसळवली असे म्हणावे लागेल, असे भाष्य वंजारी यांनी केले. यशवंतरावांमध्ये बालपणापासूनच आत्मविश्वास होता. यशवंतरावांच्या मूल्यांचे पालन आणि संस्काराची जपणूक त्यांच्या अनुयायांनी केली असती, तर महाराष्ट्राची अधोगती थांबली असती, असे प्रतिपादन गिरीश गांधी यांनी केले. त्यांच्या विचारांचे पालन केले तर आजही महाराष्ट्र समोर जाऊ शकतो आणि मूल्यांची पडझड थांबवता येईल, असे गांधी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे व संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. रमेश बोरकुटे यांनी आभार मानले.

Story img Loader