आपल्या दारात आलेल्या विक्रेत्यांकडून कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना कितीही सावधगिरी बाळगली तरीही अनेकांच्या नशिबी फसवणूक येतेच. उपनगरामध्ये सध्या महागडय़ा वस्तू स्वस्त दरामध्ये विकणाऱ्या ‘स्मार्ट तरुणीं’ची फौज फिरत असून त्यांचा फंडा मात्र वेगळाच आहे. त्यांच्याकडून बेमालूम फसवणूक झालेल्या मध्यमवर्गीय महिलांची संख्या वाढत असून यापैकी कोणीही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही.
पूर्व उपनगरातील कुर्ला येथील नेहरुनगर या ‘म्हाडा’च्या वसाहतीमध्ये अशा स्मार्ट तरुणींकडून फसलेल्या महिलांच्या कहाण्या ऐकायला मिळत आहेत. सोना बेल्ट किंवा विजेचे बिल कमी करणारी यंत्रे विकण्यासाठी काही तरुणी इमारतींमधील सुरक्षा यंत्रणा भेदून प्रवेश करीत आहेत. एखाद्या घराची बेल वाजवून वस्तू घेण्याबाबत गळ घालीत आहेत. ‘आम्हाला या वस्तू नकोत’ असे सांगितल्यावरही ‘तुमच्या इमारतीमधील काहीजणांनी अनुभव घेतला आहे,’ असे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर महिनाभर वापरा आणि पसंत न पडल्यास फोन करा. ५० ते १०० रुपये कापून घेऊन बाकी पैसे परत करू,’ असे आश्वासनही देत आहेत. आपल्याच इमारतीमधील इतर नावे संबंधित तरुणींच्या पावती पुस्तकात कळत-नकळत या वस्तूंची खरेदी होत आहे. परंतु वाईट अनुभव आल्यानंतर ही वस्तू परत करण्यासाठी फोन केल्यावर तो अस्तित्वातच नाही, असा अनुभव या वसाहतीतील अनेक महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतला आहे.
मनीषा नाईक यांना अशाच एका तरुणीने साडेतीन हजार रुपयांचा सोना बेल्ट विकत घेण्यासाठी गळ घातली. आपण याच वसाहतीतील ५० क्रमांकाच्या इमारतीत राहत असून वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकही दिल्याने त्यांचा विश्वास बसला. महिनाभर बेल्ट वापरा व नको असल्यास पैसे परत करण्याचे आश्वासनही तिने दिले. असाच अनुभव रामभाऊ लव्हाळे यांनीही घेतला. काही तासांनंतर श्रीमती नाईक यांनी दिलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता तो पत्ताच अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय भ्रमणध्वनीही बनावट असल्याचे दिसून आले. विजेचे बिल कमी करण्याबाबतची यंत्रे घेऊन येणाऱ्या मुलींचा फंडा वेगळा आहे. घाटकोपर येथील एका कंपनीचे पावतीपुस्तक दाखवून ही यंत्रे विकली जातात. ‘दोन महिन्यांपूर्वी तुमच्या इमारतीमधील एका व्यक्तीने एक यंत्र विकत घेतले होते. आज त्यांनी आणखी दोन यंत्रे घेतली आहेत. तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावे यंत्र घेतले तर एकावर एक मोफत देण्यात येईल, असे या विक्रेत्या तरुणी सांगतात. त्यासाठी त्या सोबतच्या पावती पुस्तकातील जुन्या तारखांच्या आणि नवीन तारखांच्या पावत्या असलेली अनेक नावे दाखवतात. यंत्रे खरेदी केल्यावर वीज बिल कमी येण्याऐवजी जास्त येते असा अनुभव घेतलेल्या काहींनी घाटकोपर येथील संबंधित कंपनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर ही कंपनी बंद असल्याचे आणि दूरध्वनी क्रमांकही बंद असल्याचे आढळून येत आहे.
घरी येणाऱ्या विक्रेत्याकडून खरेदी करावी की नाही, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. अशा प्रकारे फसवणूक झाल्याची अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. अशी तक्रार आली तर कारवाई नक्कीच करू. मात्र तरीही अशा स्मार्ट विक्रेत्यांकडून खेरदी करताना आणि त्यांना इमारतीमध्ये प्रवेश देताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागायतकर यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा