भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) नवीन वर्षांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी दोन नवीन योजना सादर केल्या आहेत. यात विलंबित पेंशन योजना ‘न्यू जीवन निधी’ आणि युनिटशी संबंधित विमा  योजना ‘फ्लेक्सी प्लस’चा समावेश आहे, अशी माहिती क्षेत्रीय विपणन व्यवस्थापक दिनेश पांगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘न्यू जीवन निधी’ योजना कालावधीदरम्यान मृत्यू संरक्षण देते. पहिल्या पाच वर्षांसाठी प्रतिहजारी ५० रुपये दराने सुनिश्चित जमा, सहाव्या वर्षांपासून बोनस रूपात नफ्यामध्ये सहभाग, वयाची पात्रता २० ते ६० वर्षे, पॉलिसीची मुदत ५ ते ३५ वर्षे, नियमित प्रीमियम पॉलिसीवर दुर्घटना हितलाभ मिळणार आहे.
‘फ्लेक्सी प्लस’ ही युनिटशी जोडलेली विमा योजना असून यातूनही संरक्षण मिळते आणि कुटुंबाचे भविष्य सुनिश्चित होते. तसेच पैसे वाढण्यास मदत होते. या पॉलिसीची मुदत, हप्ता भरण्याची पद्धत आणि फंडाचा प्रकार याची निवड करण्याची लवचिकता, अंशत: पैसे काढून घेण्याची आणि फंडाचा प्रकार बदलण्याची सोय, मॅच्युरिटी लाभ, मृत्यूनंतर संरक्षित रक्कम एकाच वेळी देय व मृत्यूनंतर भविष्यातील हप्त्यांएवढी रक्कम देय राहील. पॉलिसीधारकाच्या फंडात ती समाविष्ट केली जाईल. पॉलिसीधारकाच्या फंडाच्या मूल्याची रक्कम नामांकित व्यक्तीला मॅच्युरिटीचा लाभ म्हणून योजलेल्या गरजांसाठी दिली जाईल. या दोन्ही योजनांचा प्रारंभ २ जानेवारीपासून झाला आहे, असे पांगटे म्हणाले.
 एलआयसीच्या नागपूर विभागाने ५० कोटींचा व्यवसाय केला असून २ लाख, ५० हजार पॉलिसीची विक्री केली आहे. वृद्धीदर २५० कोटी रुपये आहे.
विभागाने लक्ष्य पूर्ती केली असून देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक दीपक चंद्रेल यांनी दिली.
पत्रकार परिषदेला विपणन व्यवस्थापक आर देवगुप्ता, ए. झा, विक्री व्यवस्थापक एन.जी. देव प्रामुख्याने उपस्थित होते.

Story img Loader