मराठय़ांचा इतिहास आजही अनेक इतिहास अभ्यासक व संशोधकांना आव्हान देणारा विषय आहे. या संशोधनामध्ये उत्तरोत्तर भर पडत असताना मराठा कालखंडावर आधारित मध्ययुगीन सोलापूर जिल्हय़ाच्या इतिहासावर प्रकाश पडला नव्हता. परंतु गोपाळराव देशमुख यांनी लिहिलेल्या ‘सोलापूर जिल्हय़ाचा इतिहास’ या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहास संशोधकांना अभ्यासाची उपलब्धी झाली आहे. या ७०० पानी ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा येत्या शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी सोलापुरात ‘लोकसत्ता’ चे सहसंपादक अभिजित बेल्हेकर यांच्या हस्ते होत आहे.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या ग्रंथ प्रकाशन सोहळयास ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने व मंगळवेढय़ाच्या दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, अ‍ॅड. नंदकुमार पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबाबतची माहिती ग्रंथलेखक गोपाळराव देशमुख यांनी स्वत: पत्रकार परिषदेत दिली. मराठय़ांच्या इतिहासात घडलेल्या घडामोडींशी सोलापूर जिल्हय़ाचा संबंध कसा होता, याचे साधार विवेचन या ग्रंथात केले असून इतिहास अभ्यासकांना मध्ययुगीन काळातील अप्रकाशित माहिती देणारा संदर्भग्रंथ म्हणून हा ग्रंथ उपलब्ध झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हयातील ऐतिहासिक घराणी, त्यांनी दिलेले पराक्रमी पुरुष, छत्रपती शिवरायांचे या जिल्हय़ातील आगमन, आदिलशाही सल्तनतीशी-मिर्झाराजेबरोबर शिवरायांनी केलेली लढाई याच सोलापूर जिल्हय़ात झाली. याच जिल्हय़ातील कासेगाव परगण्यातून शिवरायांनी जालना स्वारीवर दहा हजार सैन्यासह दौड केली. शिवाजीमहाराज, शहाजीराजे, मालोजीराजे, छत्रपती संभाजीराजे, बालशिवाजी, शाहू, महाराणी येसूबाई, शिवरायांची राणी सकवारबाई यांच्या या जिल्हय़ातील वास्तव्याचा पुराव्यानिशी घेतलेला धांडोळा, हे या ग्रंथाचे वैशिष्टय़ आहे.
भाळवणीचे नाईक-निंबाळकर घराणे, दहिगावचे नाईक-निंबाळकर घराणे, करमाळय़ाचे रावरंभा निंबाळकर, अक्कलकोटचे राजेभोसले घराणे, तोंडले-बोंडले येथील हिंमत बहाद्दर घराणे, गुरसाळय़ाचे कवडे घराणे, कासेगावचे देशमुख घराणे, सोनंद-डोंगरगावचे बाबर घराणे आदी ऐतिहासिक घराण्यांचा पराक्रम आणि स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचे सम्यक दर्शन या गंथातून होते. संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी पिलीवजवळ केलेली लढाई ते थेट पेशव्यांची अखेरची आष्टी येथील लढाईची माहिती नकाशासह तपशिलाने या ग्रंथात उपलब्ध झाली आहे.
शिवरायांचे पहिले पेशवे श्यामराव निळकंठ यांचे मूळ घराणे याच जिल्हय़ातील होते. शिवरायांच्या शस्त्र घराण्यातील एक तलवार कासेगावच्या देशमुख घराण्याकडे आली, ही माहिती ग्रंथरूपाने प्रथमच उजेडात आली आहे. छत्रपती शिवरायांचे जावई महादजी निंबाळकर यांची समाधी, जिजाऊ माँसाहेबांच्या बंधूंचे नातू राजे जगदेवराव जाधव यांची ब्रह्मपुरी येथील समाधी, अशा बाबीही प्रथमच वाचकांसमोर ठेवण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. या वेळी अ‍ॅड. धनंजय माने, प्रा. आनंद जाधव, डॉ. श्रीकांत येळेगावकर, जगदीश बाबर आदी उपस्थित होते.