राज्यातील नाटय़गृहांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अंबड नगरपालिकेने उभारलेल्या नाटय़गृहास ‘पंडित गोविंदराव जळगावकर’ यांचे नाव देण्यात आले. यावर ३ कोटी ३५ लाख रुपये खर्च झाला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सामंत बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे अध्यक्षस्थानी होते. सामंत म्हणाले, की नाटय़गृहांच्या दुरुस्तीची सुरुवात मराठवाडय़ातून करण्यात येणार आहे. नाटय़गृहाची निगा चांगली राहावी, ही सर्वाची जबाबदारी आहे. चित्रपटांना अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असून नाटकांच्या अनुदानासाठीही २०० प्रयोगांची अट शिथिल करण्यात आली आहे.
टोपे म्हणाले, की ‘क’ वर्ग नगरपालिकेच्या क्षेत्रात मराठवाडय़ातील पहिले नाटय़गृह अंबड येथे उभारले गेले आहे. सांस्कृतिक चळवळीसाठी उपयुक्त असणारे हे नाटय़गृह अंबडच्या वैभवात भर घालणारे ठरणार आहे. गटारमुक्त व डासमुक्त अंबडसाठी आपले प्रयत्न आहेत. अंबडजवळील जंगी तलावाच्या विकासासाठी पर्यावरण विभागाच्या माध्यमातून ६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, की अंबडचे नाटय़गृह राज्यातील ६८ वे नाटय़गृह आहे. राज्यातील अनेक नाटय़गृहे चांगल्या अवस्थेत नाहीत. आमदार संतोष सांबरे, नगराध्यक्षा मंगला कटारे आदींची उपस्थिती होती.