गेल्या काही वर्षांपासून भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला असून नागपुरातील केंद्राला एक नवीनच लकाकी देण्याचे काम विद्यमान संचालिका डॉ. संगीता पकडे-यावले करीत आहेत. विदर्भासाठी १९८६मध्ये स्थापन झालेले हे एकमेव केंद्र आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांत या केंद्रात दिल्या जाणाऱ्या विविध सेवांमुळे राज्यभरातील विद्यार्थी या केंद्राकडे आकर्षित झालेले दिसून येतात. गेल्या चार वर्षांमध्ये आयएएस आणि आयपीएस बनवण्यात या केंद्राने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्याही पूर्वीचा विचार केल्यास २००१पासून या केंद्राचे ११ विद्यार्थी भारतीय नागरी प्रशासकीय सेवेत, दोन विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत आणि सहा विद्यार्थी भारतीय पोलीस सेवेत कार्यरत आहेत.
युपीएससीचा अभ्यास करीत असतानाच एमपीएससीचाही अभ्यास होत असल्याने विद्यार्थी युपीएससीबरोबरच इतरही परीक्षांना हजेरी लावत असतात. अनेकांचे ध्येय युपीएससीपेक्षा एखादी शासकीय नोकरी असावी यावरच असते. त्यामुळेच ग्रामसेवकापासून नायब तहसीलदार, विक्रीकर निरीक्षक, खंड विकास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, मुख्याधिकारी वर्ग दोन आदी अशा शेकडो पदांवर शेकडो विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या असून त्या कामी त्यांना या प्रशिक्षण केंद्राचे मोठे योगदान लाभले आहे. केंद्र जरी युपीएससीचे असले तरी सर्वाचीच बुद्धिमत्ता किंवा घरची परिस्थिती सारखी नसते. काही वेळेस नोकरी ही घराची गरज बनते. त्यावेळी उमेदवार सरकारी नोकरी मिळाली म्हणून महत्त्वाकांक्षा न बाळगता पुढील अभ्यासाला विराम देऊन नोकरी पत्करतात. त्यात काही गैर नसल्याचे मत  डॉ. संगीता पकडे-यावले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
गेल्या चार वर्षांपासून केंद्राचा कायापालट झाला असून त्यांच्या प्रयत्नांनीच युपीएससी पूर्व प्रशिक्षण केंद्राची एक प्रशासकीय इमारत आणि भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १२० खोल्या असलेल्या निवासी वसतिगृहाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना जिल्हा नियोजन समितीकडून १० कोटी २४ लाख रुपये निधी प्राप्त झाला. नवीन प्रशासकीय इमारतीशेजारी निवासी वसतिगृह, त्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसह एव्ही थिएटर, २०० विद्यार्थ्यांसाठी २४ तास वातानुकूलित वाचनालय, मेस, टीव्ही रूम आणि प्रशस्थ खोल्या असलेले वसतिगृह आणि प्रशासकीय इमारत सध्या उद्घाटनासाठी सज्ज केलेल्या आहेत. सध्या या केंद्रातील प्रवेश क्षमता ६० आहे. ती १००च्यावर जावून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा यासाठी डॉ. यावले प्रयत्नशील आहेत.

Story img Loader