सध्या बीएमएमच्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये ‘एज्युसंचार’ या अॅपची चांगलीच चालती आहे. मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक डॉ. मंगेश करंदीकर यांनी तयार केलेल्या एज्युसंचार या मालिकेतील दुसरे अॅप नुकतेच अॅन्ड्रॉइड मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेतील पहिले अॅप विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून व काळाची गरज ओळखून डॉ. करंदीकर यांनी आणखी अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोबाइल हा प्रत्येक मुलाचा एक सोबती बनला आहे. या सोबतीचा वापर मुलांनी केवळ टाइमपास करण्यासाठी न करता अभ्यासासाठीही याचा वापर व्हावा म्हणून डॉ. करंदीकर यांनी अॅपची संकल्पना मांडली. पहिले अॅप संज्ञापन अभ्यासातील संकल्पना आणि सिद्धान्त या विषयावर आहे, तर दुसरे मराठीत संज्ञापन हा विषय शिकणाऱ्या आणि संज्ञापनाचा उपयोग करणाऱ्यांसाठी आहे. ‘बातम्या आणि मनोरंजन’ मोबाईल माध्यमात कसे आणता येईल यावर संशोधन सुरू असताना या सर्वाची सुरुवात झाली. या उपक्रमास आम्ही ‘संचारफर्स्ट’ असे नांव दिले. पारंपरिक शिकविण्याच्या तंत्रांबरोबर मोबाईलचा वापरही केला पाहिजे हे आम्हाला लक्षात आले. आमचे पहिले अॅप माध्यम व संज्ञापनच्या थिअरीज यावर होते. आता हे अॅप माध्यम आणि पत्रकारिता अभ्यासातील व्याख्या, संकल्पना, उपपत्ती यांचा अभ्यास करण्यासाठी आहे. हे अॅप विनामूल्य आहे. यामध्ये १७५ पाने असून तब्बल १२५ व्याख्या देण्यात आल्या आहेत, असे डॉ. करंदीकर म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे एकदा हे अॅप डाउनलोड केले की सारखे ऑनलाइन जावे लागत नाही. ‘आम्ही अॅपची एक शृंखलाच बनवायचे बनवायचे ठरविले आहे. या पुढील अॅप फिल्म स्टडीज, नवीन माध्यम, टेलिव्हिजन स्टडीज आणि जनसंपर्क या विषयांवर असतील, असे या अॅपचे लेखक, डॉ. संजय रानडे म्हणाले.
माध्यम आणि पत्रकारिता अभ्यासातील व्याख्या, संकल्पना, उपपत्ती इंग्रजी क्रमानुसार मांडण्यात आल्या आहेत. त्यावर क्लिक केल्यावर व्याख्या वाचता येतात. यात दिलेल्या प्रत्येक व्याख्येचे संदर्भही दिलेले आहेत. डॉ. करंदीकर यांनी तयार केलेल्या पहिल्या एॅपला चांगला प्रतिसाद मिळाला असून इंग्रजी आहे मराठी अशा दोन्ही भाषेतील या अॅपला महिनाभरात १५००हून अधिक डाऊनलोडस मिळालेले आहेत.