वाशी येथील बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार लोहारिया हत्या प्रकरण गृहविभागाने मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे हस्तांतरित केल्याने नवी मुंबई पोलिसांचे चांगलेच खच्चीकरण झाले आहे. पाच दिवसांत हा तपास अंतिम टप्प्यात नेण्यात आला होता. या प्रकरणात दोन बडय़ा बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली होती, पण एका उच्च अधिकाऱ्याने यात खो घातल्याने पोलिसांनी हे अटकसत्र पूर्ण केले नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पोलिसांनी आता चेन स्नॅचिंगसारखी प्रकरणेही मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करा, अशी भावना व्यक्त केली आहे.
वाशी येथील वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक सुनील कुमार लोहारिया यांची गेल्या आठवडय़ात शनिवारी त्यांच्या कार्यालयात जाताना निर्घृण हत्या झाली. या हत्येतील एक मारेकरी लोकांच्या प्रसंगावधनामुळे घटनास्थळी सापडल्याने पोलिसांचे काम अधिक सोपे झाले. व्यंकटेश शेट्टीयार नावाच्या या मारेकऱ्याने सुपारी देणाऱ्या माजी पोलीस अधिकारी सॅम्युअल अमोलिक याचे नावे सांगितल्याने नवी मुंबई पोलिसांनी अमोलिकला ठाण्यातून पहाटे अटक केली. त्यानंतर प्रत्यक्ष हत्या करण्यासाठी शेट्टीयार सोबत असणाऱ्या आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्यामुळे या हत्येमागील उद्देश स्पष्ट झाला होता. ही हत्या अमोलिक याने सुपारी देऊन केली असली तरी ही अमोलिकला कोणी दिली हा प्रश्न अनुत्तरित होता. त्यानंतर ही सुपारी नवी मुंबईतील दोन बांधकाम व्यावसायिकांच्या इशाऱ्याने वाजविण्यात आल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. त्यामुळे त्या दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्याची संपूर्ण तयारी तीन उच्च अधिकाऱ्यांनी केली होती, पण या तीन उच्च अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्या बांधकाम व्यावसायिकाला अटक न करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी आपल्या हातकडय़ा पुन्हा खुंटीला टांगून ठेवल्या. या दोन बांधकाम व्यावसायिकांपैकी एका व्यावसायिकाचे त्या उच्च अधिकाऱ्याबरोबर मधुर संबंध आहेत. खुनासारख्या प्रकरणात केवळ तीन दिवसांत इतकी प्रगती करूनही कुमार यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आल्याने नवी मुंबई पोलीस कमालीचे नाराज आहेत.  या प्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला होता पण कुमार हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलीस तपासाच्या अंतिम टप्प्यात गेले होते. अमोलिक आणि संशयित बांधकाम व्यावसायिक यांचे मोबाइल संभाषण पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरून त्या बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्याची मागणी वरिष्ठांकडे करीत होते, पण ती न मिळाल्याने पोलीस नाउमेद झाले. मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गुरुवारी नवी मुंबईत येऊन गेले. त्यांनी नवी मुंबई पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासावरच हे पोलीस उद्याचे श्रेय घेणार असल्याची खंत नवी मुंबई पोलिसांना आहे. सिंग प्रकरणात मुंबई पोलीसही आतापर्यंत चाचपडत आहेत.