‘मलेरियाचे शहर’ म्हणून बसलेला शिक्का प्रयत्नपूर्वक पुसून काढत पाच वर्षांपूर्वी मलेरिया प्रतिबंधक विभागाला आयएसओ प्रमाणपत्राचा सन्मान मिळवून देणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील मलेरिया आणि डेंग्यू प्रतिबंधक विभागास गेल्या दोन वर्षांपासून कमालीचे शैथिल्य आले असून मलेरिया नियंत्रणासाठी या विभागाने काही वर्षांपूर्वी आखलेल्या र्सवकश अशा कार्यक्रमाची एव्हाना पुरती धुळदाण उडाल्याने आयएसओ प्रमाणपत्रासाठी फेरअर्ज करावा की नाही, या विवंचनेत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सापडले आहेत.
आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात मलेरियाने दाखल असलेल्या रुग्णांचा आकडा केव्हाच एक हजाराच्या पुढे सरकला असून डेंग्यूग्रस्त रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत विक्रमी असे आहे. खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मलेरिया आणि डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांची माहिती मिळावी यासाठी आरोग्य विभागाने आखलेला तपासणी कार्यक्रमही पूर्णपणे बंद झाल्याची विश्वसनीय माहिती असून महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, शहरातील राजकीय पदाधिकारी मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने रुग्णशय्येवर असल्याने महापालिकेतील भोंगळ कारभार उघड होऊ लागला आहे.
नवी मुंबईत सुरुवातीच्या काळात झपाटय़ाने सुरू असणाऱ्या बांधकाम प्रक्रियेमुळे या शहरात मलेरियाने अक्षरश: थैमान घातले होते. मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेले शहर म्हणून नवी मुंबईचे नाव सर्वात पुढे असायचे. ही परिस्थीती बदलावी, यासाठी महापालिकेने मागील दशकभरात सातत्याने काम केले. विजय नहाटा यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे असताना मलेरिया नियंत्रणाचे काम त्यांनी साफसफाई विभागाकडे सोपवले आणि उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या माध्यमातून या विभागाने मलेरिया नियंत्रणासाठी आयएसओ प्रमाणपत्र मिळवले. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये मलेरियाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे चित्र असताना या काळात नवी मुंबई महापालिकेने सातत्यपूर्ण कामगिरी करून मलेरियाचा प्रसार फारसा वाढू दिला नव्हता. डासनाशक फवारणीपेक्षा डास निर्मिती केंद्र शोधून अळ्यांवर नाशक फवारणी करण्याची मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबविण्यात आली. यामुळे मलेरियावर नियंत्रण मिळविता आले नाही, तरीही प्रसार रोखण्यात महापालिकेस यश मिळाले. डासांच्या निर्मिती केंद्रांचा अभ्यास करुन त्यासंबंधी सविस्तर असे मॅपिंग करण्यात आले. शहरातील प्रत्येक गटारांना ठराविक क्रमांक आखण्यात आले आणि त्यानुसार फवारणीच्या वेळा ठरविण्यात आल्या. खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची माहिती मिळावी यासाठी काही नियम नव्याने आखण्यात आले. तसेच या रुग्णालयांमध्ये नोंदणीसाठी रजिस्टर ठेवण्यात आली. या कामाची पद्धत इतकी उपयोगी ठरली की हा कार्यक्रम नेमका कशा प्रकारे अमलात आणला गेला यासाठी राज्याच्या तत्कालीन आरोग्य सचिवांनी जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना नवी मुंबईत जाऊन अभ्यास करण्याचे निर्देश दिले. मलेरिया नियंत्रणाची प्रक्रिया ही वर्षभर सातत्याने राबविणे गरजेचे असते. केवळ पावसाळ्यापुरते हे काम करून भागत नाही. नवी मुंबईत मलेरियाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही, याचे कारण येथे वर्षभर नियंत्रणाची मोहीम राबविली जात होती. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, वसई-विरार यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनीधींनी नवी मुंबईचा मलेरिया नियंत्रण पॅटर्न अंमलात आणण्यास एव्हाना सुरुवात केली आहे.
यासंबंधी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मलेरिया, डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा आटोक्यात आहे, असे सांगितले. मलेरिया नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. दयानंद कटके यांच्याशी संपर्क साधला असता सगळे ठीक आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो, असे सांगून प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थता दर्शवली.
नवी मुंबईत मलेरिया नियंत्रणाचे तीनतेरा
एकीकडे नवी मुंबईतील मलेरिया नियंत्रणाचा कार्यक्रम जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या महापालिकांमध्ये राबविण्यात येत असला तरी नवी मुंबईत मात्र या कार्यक्रमाचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसू लागले आहे. महापालिकेच्या केलेल्या नियोजनानुसार २०१३ पर्यंत डास नियंत्रण धुरीकरण मोहीम पूर्णपणे थांबविण्याचे लक्ष्य आखून घेण्यात आले होते. धुरीकरणामुळे डासांवर कोणतेही नियंत्रण येत नाही हे एव्हाना स्पष्ट झाले असून त्याऐवजी अळी नाशके फवारणी मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे ठरले होते. प्रत्यक्षात मूळ कार्यक्रमाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नसल्याने धुरीकरणाचा देखावा अद्याप सुरूच आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. रुग्णांची योग्य माहिती द्यावी यासाठी खासगी रुग्णालयांना आखून दिलेल्या नियमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी असून यामुळे रुग्णांचा योग्य आकडा पुढे येत नाही, असे सांगितले जाते. महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनीही मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाविषयी काही कडक सूचना आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या आठवडय़ात केल्या. तरीही मलेरिया आणि डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे, अशी माहिती महापालिकेतील उपायुक्त दर्जाच्या एका अधिकाऱ्याने दिली. मलेरिया नियंत्रण विभागास आयएसओ प्रमाणपत्र होते याविषयी खुद्द आयुक्त अनभिज्ञ असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या विभागातील कारभाराचा पुरता बोऱ्या वाजल्याने आयएसओ प्रमाणपत्रासाठी पुन्हा अर्ज करणे सध्या तरी सयुक्तिक ठरणार नाही, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत बनले आहे.