येत्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार
वाहनतळांचे पर्याय

० तलावपाळी, मार्केट परिसरात प्रकल्प
० वाहनतळांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता
० शिवसेना-राष्ट्रवादीने घेतला पुढाकार
शहरातील तलावपाळी, गडकरी रंगायतन, शाहू मार्केट, महात्मा फुले मार्केट, दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह, आदी भागांत चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी बहुमजली वाहनतळ उभारण्यात यावे, अशी सूचना या प्रस्तावात करण्यात आली आहे. ठाणे स्थानक तसेच मुख्य बाजारपेठेपासून काही अंतरावरच बहुमजली वाहनतळांची उभारणी झाल्यास या भागातील पार्किंगचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा दावा या पक्षांनी केला आहे. वाहनतळ उभारण्याकरिता प्रस्तावामध्ये सुचविण्यात आलेले भूखंड महापालिकेच्या मालकीचे आहेत. त्यामुळे महापालिकेने त्या ठिकाणी वाहनतळ उभारल्यास ठाणेकरांना पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते. वाहनतळाचा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी) किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर राबविण्यात यावा, त्या दृष्टिकोनातून महापालिकेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे.  

ठाणे शहरातील अपुऱ्या वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ठाण्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना उशिरा का होईना जाग आली असून मूळ शहरातील मुख्य भागांमध्ये तीन ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील वाहनतळांचे एक धोरण आखले असून यानुसार महत्त्वाच्या रस्त्यांच्या कडेला पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगला शिस्त निर्माण होणार असली तरी नव्या वाहनतळांच्या उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लागेल का, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या पाश्र्वभूमीवर तलावपाळी, शाहू मार्केट, दादोजी कोंडदेव स्टेडियम अशा काही भागांत बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्रितपणे मांडला आहे.  
बांधा, वापरा, हस्तांतरित करा अथवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर बहुमजली वाहनतळाचा प्रकल्प राबिण्यात यावा, अशा सूचना सभागृह नेते नरेश म्हस्के तसेच विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी येत्या सर्वसाधारण सभेत ठरावाद्वारे केली आहे. बीओटी प्रकल्पास फारसा प्रतिसाद मिळाला नाही, तर महापालिकेमार्फतच हा प्रकल्प राबविण्यात यावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांत वाहने उभी करण्यासाठी पार्किंग झोन आहेत. मात्र, शहरात वाहनांसाठी बहुमजली वाहनतळाची सुविधाच उपलब्ध नाही. तसेच बहुतेक पार्किंग झोन रस्त्यावरच असल्याने शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ठाणे स्थानक तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात पार्किंगची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या परिसरात कोठे वाहने उभी करायची, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. त्यामुळेच ठाणे शहरातील सद्यस्थितीतील व भविष्यातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन बहुमजली वाहनतळ उभारण्याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच या प्रस्तावासंबंधीची सूचना त्यांनी येत्या ८ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मांडली असून त्यामध्ये या विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

Story img Loader