शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्ता वाढीला प्राधान्य देतानाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. तसेच शासन दरबारी धूळखात पडलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राचा परिपूर्ण प्रस्तावही आता नव्याने तयार केला आहे.
या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप उके यांनी ही जबाबदारी स्वीकारून जेमतेम दीड महिना झाला असून या कालावधीत त्यांनी आखलेल्या नावीन्यपूर्ण योजनांना विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीने नुकतीच मान्यता दिली. उके यांच्या या संकल्पनांचे अन्य विद्यापीठांच्या कुलगुरूंनी स्वागत केले आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या पुढाकारातून दोन विद्याशाखांच्या पीएच.डी. मार्गदर्शकांची दिवसभराची कार्यशाळा नुकतीच पार पडली. मोठा प्रतिसाद लाभलेल्या या कार्यशाळेतून संशोधनात्मक कार्याची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने सखोल विचारमंथन झाले. पण जनसंपर्क विभागाच्या ‘अनागोंदी’ कारभारामुळे कार्यशाळेला व्यापक प्रसिद्धी मिळाली नाही. या पाश्र्वभूमीवर कुलगुरूंशी थेट संवाद साधल्यानंतर विद्यापीठात येऊ घातलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती समोर आली.
डॉ. उके म्हणाले, की ‘नवी जबाबदारी स्वीकारली तेव्हाच आपण काही योजना आखल्या होत्या. शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी कल्याणकारी योजना असाव्यात या कल्पनेतून आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर कुलगुरू सहायता निधी स्थापन करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संकुलातील गरजू विद्यार्थ्यांना मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची वर्गणी आणि विद्यापीठाचा सहभाग याद्वारे एक स्वतंत्र निधी उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक संकुलातील एक गरीब पण होतकरू विद्यार्थिनी दत्तक घेऊन तिच्या शिक्षण कालावधीचा संपूर्ण खर्च विद्यापीठ करणार आहे. यंदा विद्यापीठ तसेच लातूर उपकेंद्र आणि हिंगोली मॉडेल कॉलेज येथील २१ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळेल’.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी राहिलेले दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी राज्यासाठी दिलेले योगदान तसेच त्यांचे आस्थाविषय विचारात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठ परिसरात एक अध्यासन केंद्र उभारण्याची घोषणा डॉ. उके यांनी केली. आधीच्या कुलगुरूंनी हा विषय अर्धवटच सोडून दिला. पण आता त्याला प्राधान्य देत, परिपूर्ण प्रस्ताव तयार झाला आहे. या केंद्रात लोकप्रशासन, कायदा आणि ग्रामविकास या विषयांवरील शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रम राबविले जातील. त्यासाठी स्वतंत्र इमारतीसह परिपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मनोदय निर्धार प्रभारी कुलगुरूंनी बोलून दाखविला. या केंद्रासाठी केवळ राज्य शासनावर अवलंबून न राहता अनेक पर्यायांचाही विचार केला जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होऊन ते प्रश्न निकाली काढण्यासाठी चार प्राचार्य व विद्यापीठाचे चार अधिकारी यांची समन्वय समिती स्थापण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
‘स्वारातीम’ विद्यापीठात नव्या योजनांची आखणी
शैक्षणिक व संशोधनात्मक गुणवत्ता वाढीला प्राधान्य देतानाच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी कल्याणाच्या वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत.
First published on: 01-07-2013 at 01:47 IST
TOPICSप्रोजेक्ट
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New plan of project in university of swaaratim