सोनसाखळी चोरीच्या वाढत्या गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी उशिरा का होईना ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून या चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘खास व्यूहरचना’ आखली आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांचा तसेच घटनास्थळांचा सविस्तर अभ्यास करून ही व्यूहरचना आखण्यात आली असून त्याद्वारे शहरात मुक्तपणे संचार करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. ही व्यूहरचना गोपनीय ठेवण्यात येणार असून तिची येत्या काही दिवसांत सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढू लागले असून सोनसाखळी चोरटय़ांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे ठाणे पोलिसांची डोकेदुखी वाढू लागली आहे.
मध्यंतरी, सोनसाखळी चोरटय़ांचा बीमोड करण्यासाठी ठाणे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना आवाहन केले होते. तसेच सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यासाठी संपूर्ण आयुक्तालयात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले होते. त्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त के.पी. रघुवंशी रस्त्यावर उतरले होते. त्यामध्ये काही सोनसाखळी चोर तसेच अट्टल गुन्हेगार पोलिसांना सापडले होते.
सोनसाखळी चोर मोटारसायकलींचा वापर करीत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत होती. त्यात पोलिसांकडून मोटारसायकलींची कसून तपासणी करण्यात येत होती. त्यामुळे सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना काहीसा आळा बसला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भीड चेपलेले सोनसाखळी चोरटे पुन्हा शहरात सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस विभाग व्यस्त होता. याच संधीचा फायदा घेत चोरटय़ांनी शहरातील उपद्रव वाढविल्याचे दिसून येते. दिवसाला दोन ते तीन सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या बंदोबस्तातून काहीशी सुटका होताच ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरटय़ांकडे मोर्चा वळविला असून अशा गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्तालय हद्दीतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्य़ांतील सोनसाखळी चोरांची कार्यपद्धती, तसेच गुन्ह्य़ाचे घटनास्थळ या सर्वाचा सविस्तर अभ्यास ठाणे पोलिसांकडून गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू होता. त्याआधारे सोनसाखळी चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी ‘खास व्यूहरचना’ आखली असून त्याविषयी सोनसाखळी चोरटय़ांना थांगपत्ता लागू नये, यासाठी ही व्यूहरचना गोपनीय ठेवण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा