डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर टपाल कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे विष्णुनगर टपाल कार्यालय पूर्व भागातील फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले होते. या इमारतीमधील जागा नागरिक, कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गैरसोयीची आणि अपुरी होती. त्यामुळे आता पश्चिम भागातील उमेशनगरमधील पालिकेच्या एका जागेत हे टपाल कार्यालय सुरू करण्याचा निर्णय टपाल विभागाने घेतला आहे.
कल्याणचे टपाल विभागाचे साहाय्यक अधीक्षक रत्नाकर टोपारे यांनी पालिकेसोबत करार करून ९९ हजार रुपये भाडय़ाने दोन वर्षांसाठी ही जागा टपाल कार्यालयासाठी ताब्यात घेतली आहे. ही जागा १८९ चौ. मी. ते १४७ चौ. मी. आहे. तळमजल्याला ही जागा असल्याने वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना सोयीचे पडणार असल्याचे टपाल कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. डोंबिवली पश्चिमेत एकमेव असलेले विष्णुनगर टपाल कार्यालय पूर्व भागात स्थलांतरित केल्याने वृद्ध नागरिकांना रिक्षेने, रेल्वे पुलावरील गर्दीतून जावे लागत होते. फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयाची जागा आधीच अपुरी आहे. फडके, विष्णुनगर अशा दोन्ही टपाल कार्यालयांमधील ग्राहक एकाच टपाल कार्यालयात येऊ लागल्याने फडके टपाल कार्यालयात उभे राहण्यासाठी जागा नव्हती. टीचभर जागा व ग्राहकांच्या लोंढय़ामुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला होता.
खासदार श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पालिकेला पत्र देऊन पालिकेची पश्चिमेतील जागा विष्णुनगर टपाल कार्यालयाला उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. नवीन जागेत फर्निचरचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने हे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे, असे टपाल अधिकाऱ्यांनी सांगितले.
विष्णुनगर टपाल कार्यालय उमेशनगरमधील नवीन इमारतीत
डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर टपाल कार्यालयाची इमारत धोकादायक झाल्यामुळे विष्णुनगर टपाल कार्यालय पूर्व भागातील फडके रस्त्यावरील टपाल कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले होते.
First published on: 18-09-2014 at 12:23 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New premises for dombivli post office