ठाणे शहरात मोठय़ा संख्येने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांमुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागल्याचा शोध लावल्यानंतर ठाणे महापालिकेने नव्याने उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांच्या विकासकांनीच वाहतूक कोंडी मुक्तीच्या उपाययोजना शोधाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करणारा नवा प्रस्ताव तयार केला आहे. ठाण्याच्या घोडबंदर पट्टय़ात ‘टाउनशिप’च्या धर्तीवर मोठय़ा विकासकांचे प्रकल्प सुरू असून हे प्रकल्प उभे करत असताना वाहतुकीचे ठोस नियोजन करण्यात या विकासकांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. या गृहसंकुलांचा परिसर वाहतूक कोंडीचा आगार ठरू लागल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने यापुढे बांधकाम परवानगी देताना संबंधित विकासकाकडूनच वाहतूक नियोजनाचा बारकाईने अभ्यास करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्वरूपाचा नियोजन अहवाल संबंधित विकासकाने महापालिकेस सादर करावा आणि त्यास मंजुरी मिळाल्यास अंमलबजावणीही करावी, असा दंडक महापालिका घालणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात बडी संकुले उभी राहिल्यानंतर महापालिकेस जाग आल्याने हे ‘उशिराने सुचलेले शहाणपण’ असल्याची प्रतिक्रिया नियोजन क्षेत्रातील जाणकार व्यक्त करू लागले आहेत.
राज्य सरकारच्या धोरणानुसार गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात टाउनशिपच्या धर्तीवर शेकडो एकरच्या जमिनींवर मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. वर्तकनगर, शिवाईनगर, घोडबंदर अशा मार्गाचा झपाटय़ाने विकास झाला असून येऊरच्या डोंगरांच्या पायथ्याशी बडय़ा बिल्डरांनी आपले प्रकल्प सुरू केले आहेत. ठाणे महापालिकेने मध्यंतरी प्रायोजित केलेल्या उपवन आर्ट फेस्टिवलसाठी मोठमोठय़ा बिल्डरांनी हिरवा गालिचा अंथरला होता. याच परिसरात उभ्या राहणाऱ्या गृहसंकुलांची जाहिरात करण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न होता. शहरातील रियल इस्टेट क्षेत्राचा झपाटय़ाने विकास होत असला तरी या माध्यमातून वाहतूक कोंडीसारख्या मोठय़ा समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत.
गृहसंकुलांचा परिसर कोंडीमय
ठाणे महापालिका क्षेत्र हे सुमारे १२८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विखुरले असून यामध्ये २८३ चौरस किलोमीटर इतके रस्त्यांचे जाळे पसरले आहे. शहरातील अस्तित्वातील रस्त्यांचे जाळे आणि भविष्यात येऊ घातलेल्या विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने तयार होणाऱ्या रस्त्यांचा महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने नव्याने अभ्यास सुरू केला आहे. या रस्त्यांवर वाहतुकीचे प्रमाण किती असेल, ते शहराला सोसवेल का, यांसारख्या नियोजनाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या मुद्दय़ांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. असे असले तरी मोठय़ा गृहसंकुलांना परवानगी देताना त्यालगत असलेल्या रस्त्यांचा आणि त्यावरील वाहतुकीचा यापूर्वी गांभीर्याने विचार करण्यात आला नसल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे. टाउनशिपच्या धर्तीवर उभ्या राहिलेल्या मोठय़ा गृहसंकुलांलगत हे चित्र प्रकर्षांने दिसू लागले आहे. त्यामुळे यावर उपाय शोधण्यासाठी आता बडय़ा बिल्डरांनाच कामाला लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
बिल्डरांनीच करावे वाहतूक नियोजन
एखादा प्रकल्प उभा करत असताना संबिंधत बिल्डरने गृहसंकुलातील आणि बाहेरील वाहतुकीचा सूक्ष्म अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल महापालिकेस सादर करावा, असे बंधन येत्या काळात टाकले जाण्याची शक्यता आहे. टाउनशिपच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यास परवानगी देताना अशा प्रकारचे सूक्ष्म परीक्षण बंधनकारक करण्यात येणार आहे. खासगी संकुलाच्या विकासकाने स्वखर्चाने यासंबंधीचा परीक्षण अहवाल सादर करावा. या अहवालाचा सविस्तर अभ्यास करून महापालिका उपाययोजनांसह त्यास परवानगी देईल आणि त्यानंतर विकासकानेच या आराखडय़ाची अंमलबजावणी करावी, असे बंधनकारक करण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत यासंबंधीच्या ढोबळ आराखडय़ास मंजुरी देण्यात आली असली तरी शहर विकास विभागात या प्रस्तावासंबंधित वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा