नाशिकच्या क्रीडा क्षेत्रातील नवीन आशा म्हणून बघितले जात असलेल्या धावपटू संजीवनी जाधवने चेन्नई येथे आयोजित १५ व्या फेडरेशन चषक कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत सुवर्ण पटकाविले आहे. एकीकडे नाशिकचा किसन तडवी भारतीय संघातून बँकॉक येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळणार असताना संजीवनीने राष्ट्रीय पातळीवर केलेली कामगिरी हा नाशिकच्या अॅथलेटिक्स क्षेत्रासाठी दुग्धशर्करा योग मानला जात आहे.
कविता राऊतनंतर नाशिकचे अॅथलेटिक्स क्षेत्र अंजना ठमके आणि संजीवनी जाधव या दोघी गाजवीत आहेत. तर, मुलांमध्ये सुरेश वाघ, दत्ता बोरसे, किसन तडवी अशी गुणवत्तापूर्ण धावपटूंची फळीच उभी आहे. संजीवनीने चेन्नई येथे आयोजित फेडरेशन चषक कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटर अंतर १७:११:२७ या वेळेत कापत सुवर्ण मिळविताना नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. याआधीचा विक्रम पश्चिम बंगालच्या साया खातीमच्या (१८:१७:३०) नावावर होता. संजीवनी ही भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत असून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने संजीवनीला पुरस्कृत केले आहे.