घोडबंदर परिसरात एका खासगी मोबाइल कंपनीची वाहिनी टाकण्याचे काम सुरू असल्याने ऐन दिवाळीत नवे-कोरे रस्ते संबंधित ठेकेदाराकडून खोदले जात असून याच ठेकेदारांकडून अनधिकृत मोबाइल टॉवरही उभारले जात आहेत. या दोन्ही कामांची परवानगी विचारणाऱ्या नगरसेवकांना संबंधित ठेकेदाराकडून गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे, असा सनसनाटी आरोप स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारच्या सभेत केला. या प्रकरणी ऐन दिवाळीत रस्ते खोदाई नको, अशी भूमिका सदस्यांनी घेतल्याने स्थायी समिती सभापती विलास कांबळे यांनी रस्ते खोदाईच्या कामास स्थगिती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच ठेकेदाराकडून उभारण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवरवरही तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
घोडबंदर परिसरात नवे-कोरे रस्ते तयार करण्यात आले असून त्यांची तीन वर्षांची मुदतही अद्याप संपलेली नाही. असे असतानाच एका खासगी मोबाइल कंपनीची वाहिनी टाकण्यासाठी या रस्त्यांवर खोदाईचे काम सुरू आहे. तसेच इंटरनेट आणि मोबाइल सुविधा अधिक जलदगतीने उपलब्ध करून देण्यासाठी रस्त्यामध्ये वाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यासाठी वाघबीळ परिसरात दोन मोबाइल टॉवर उभारण्यात आले असून मंजूर रस्त्याच्या मधोमध हे टॉवर आहेत. तसेच कॉसमॉस येथील सुविधा भूखंडावरही अशा स्वरूपाचा टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. ऐन दिवाळीत नवे-कोरे रस्ते खोदले जात आहेत. त्यामुळे या कामांच्या परवानगीविषयी ठेकेदाराकडे विचारणा केल्यास तो पोलीस ठाण्यात येऊन परवानगी पाहाण्यास सांगतो. आमच्याकडे निवृत्त पोलीस अधिकारी असल्याने आम्हाला कायदे माहीत आहेत, त्यामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अशी धमकी ठेकेदाराकडून देण्यात येते. अशी माहिती नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नरेश मणेरा, नरेश म्हस्के, संजय भोईर आणि नजीब मुल्ला यांनी गुरुवारच्या सभेत दिली. त्यानंतर सर्वच सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, रिलायन्स कार्पोरेट या कंपनीला भारत सरकारने ४-जी करिता ठाणे, नवी मुंबई या शहरात वाहिन्या टाकण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, या कंपनीच्या ठेकेदारामार्फत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासंबंधी राज्याच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. प्रायोगिक तत्त्वावर उपवन आणि मुल्लाबाग परिसरात मोबाइल टॉवर उभारण्यास परवानगी दिली आहे. तसेच या टॉवरची लोकप्रतिनिधींनी पाहाणी केल्यानंतर त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी येईल, अशी माहिती शहर अभियंता के. डी. लाला यांनी दिली. त्यानंतरही ऐन दिवाळीत रस्ते खोदाई नको तसेच अनधिकृत मोबाइल टॉवर तातडीने हटवा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. त्यामुळे स्थायी समिती सभापती विलास कांबळे यांनी रस्ते खोदाईच्या कामास स्थगिती देण्याचे तसेच अनधिकृत मोबाइल टॉवरवरही तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा