येथील श्री समर्थ सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने एक मेपासून ‘मकरंद संचय ठेव’ ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत १५ महिन्यांकरिता १०.५० टक्के तसेच ज्येष्ठ नागरिक व सहकारी विश्वस्त संस्थांसाठी ११ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे.
शालिमार चौकातील आयएमए सभागृहात बँकेचे अध्यक्ष वासुदेव रवळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मधील सुधारणेप्रमाणे करण्यात आलेल्या बँकेच्या पोटनियम दुरुस्ती प्रस्तावनेस मंजुरी देण्यात आली. रवळगांवकर यांनी प्रास्ताविक केले. ३१ मार्चअखेर बँकेच्या एकूण ठेवी १५५ कोटी ५५ लाख झाल्या असून कर्जवाटप ९४ कोटी ७० लाख आहे. बँकेस एक कोटी ६५ लाख इतका करोत्तर नफा झालेला आहे.
बँक २०० कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करीत आहे. सूत्रसंचालन बँकेच्या मानद कार्यकारी संचालक हेमा दशपुत्रे यांनी केले. सभेचे नोटीस वाचन स्नेहल देशपांडे यांनी केले.
संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देण्याविषयीची माहिती बँकेचे संचालक विवेकानंद उमराणी यांनी दिली. २०१२-१३ या आर्थिक वर्षांच्या लेखा परीक्षणाकरिता नेमणूक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे या विषयाची माहिती बँकेचे संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा