इंग्लिश भाषेच्या बोलण्याचा, लिहिण्याचा, संवादाचा, संभाषण कौशल्याचा नेमका दर्जा काय व तो वाढवण्यासाठी काय करायला हवे ? याचे सॉफ्टवेअर लातूरच्या श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला अध्यापक विद्यालयातील प्रा. संजय क्षीरसागर यांनी विकसित केले आहे.
 भाषेवर प्रभुत्व यावे यासाठी शालेय स्तरापासून पारंपरिक पद्धतीने मेहनत घेतली जाते. सरावातून भाषा विकसित होते हे खरे असले, तरी प्रत्येक स्तरावर आपल्या भाषेचा नेमका दर्जा काय आहे ? याचे मूल्यमापन करण्याची पद्धती आजवर विकसित झालेली नाही.या नव्या प्रणालीमुळे आशा निर्माण झाली आहे. शाळा, महाविद्यालय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील गुण हे मूल्यमापनाचे प्रमाण मानले जायचे मात्र त्यानंतर भाषेच्या मूल्यमापनाकडे विविध कारणांमुळे दुर्लक्ष होते. जेव्हा गरज भासते तेव्हा शिकवणी वर्गाकडे लोकांचा कल असतो. मात्र, घरच्या घरी आपल्या भाषेचा दर्जा नेमका काय आहे व तो विकसित करण्यासाठी मला काय मेहनत घ्यावी लागेल? हे सांगणारे साधन उपलब्ध झाल्यामुळे आता चांगली सोय झाली आहे. या सॉफ्टवेअरचे जनक प्रा. संजय क्षीरसागर यांना या सॉफ्टवेअरविषयी विचारले असता ते म्हणाले,  एखाद्या रुग्णाला ताप आला, तर  तापमापकाने लगेच तो मोजता येतो. त्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीचा भाषेचा दर्जा काय आहे, हे तपासण्याचे साधन उपलब्ध असले पाहिजे असे मला बारावीत शिकत असल्यापासून वाटत होते. त्याचाच परिपाक म्हणून हे सॉफ्टवेअर विकसित झाले. डी.एड.ला शिकवत असताना मूल्यमापनावर अधिक भर असतो. कौशल्याचे मूल्यमापन हे आकलन व आशयाच्या पातळीवर केले जाते. ते कौशल्याच्या पातळीवर असायला हवे. शास्त्रशुद्ध व नैसर्गिक पद्धतीने भाषा शिकली गेली पाहिजे व त्या आधारे भाषेचे मूल्यमापन व्हायला हवे. आज सर्वत्र इंग्लिशचे पेव फुटले आहे. पहिलीपासून इंग्लिश, सेमी इंग्लिश, इंग्लिश माध्यमांच्या शाळा अशा सर्व ठिकाणी इंग्लिश शिकवली जाते. या शाळातून शिकवले जाणारे इंग्लिश हे दर्जेदार नाही हे सांगण्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. कारण इंग्लिश शिकवणाऱ्यांचा दर्जा हा चांगला नाही. शिक्षकांचा भाषेचा दर्जा सुधारला गेला तरच विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारेल. शिक्षण पद्धतीत भाषिक गुणवत्ता असलेले पाच टक्केच विद्यार्थी बाहेर पडतात. आपण विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरमुळे सामाजिक, शैक्षणिक नियोजनाचे अडथळे दूर केले गेले, तर भाषेची गुणवत्ता विकसित होण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक होऊ शकते, असा दावा ते करतात. या सॉफ्टवेअरमध्ये आंतरराष्ट्रीय शब्दकोशाच्या आधारास प्राधान्य दिले आहे. विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, भाषातज्ज्ञ, शिवाय भाषा शिकणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आपल्या भाषेचा दर्जा कोणता आहे हे समजून घेण्यासाठी व तो विकसित करण्यासाठी कोणते उपाय योजायला हवेत याचे योग्य मार्गदर्शन या सॉफ्टवेअरमधून केले जाते. हे सॉफ्टवेअर नेमके काय आहे? शब्द – ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे याचे भाषाशास्त्राच्या आधारावर मूल्यमापन करून अध्ययनकर्त्यांचा दर्जा, त्याच्या त्रुटी व दुरु स्तीचे उपाय सुचविले आहेत. वाक्य – वाक्यातील शब्दांचा उच्चार, गती, अर्थ, अरोह, अवरोह, वाक्याच्या विशिष्ट संदर्भानुसार अर्थ जेव्हा कळेल, तेव्हाच वाक्य योग्यप्रकारे समजले आहे की नाही हे लक्षात येईल. हावभाव, देहबोली व विरामचिन्हांचा वापर यालाही महत्त्व देण्यात आले आहे. संवाद, चर्चा, उतारावाचन, संवादकौशल्य याचा स्तर नेमका काय आहे हे तपासताना भावना, विषय, आशय, कल्पनाविस्तार, योग्य शब्दांचा वापर, ऐकणाऱ्याला त्याचा लाभ आहे का? सकारात्मक दृष्टिकोन हेही लक्षात घेतले जाणार आहे. तपासण्याच्या पद्धतीचे या सॉफ्टवेअरमध्ये १० स्तर तयार करण्यात आले आहेत. त्यात अत्यंत कमकुवत, कमकुवत, सर्वसाधारण क्षमतेपेक्षा कमी, सर्वसाधारण, सर्वसाधारणपेक्षा अधिक, बरे, छान, चांगले, उत्कृष्ट, नावीन्यपूर्ण हे दहा टप्पे आहेत. विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, व्यावसायिक, भाषा अभ्यासक यांच्या दर्जा तपासणीचे निकष वेगवेगळे आहेत. ही तपासणी झाल्यानंतर संबंधितांचा स्तर कोणता आहे हे सांगितले जाते व तो विकसित करण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे? याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. सॉफ्टवेअरमध्ये सुचविलेल्या मार्गदर्शनानुसार रोज एक तास असे ३२ दिवस मेहनत घेतली, तर संबंधिताचा स्तर वाढू शकतो. भाषेला गणिती कोष्टकात बसवून भाषा विकसित करण्यासाठी क्षीरसागर यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. हे सॉफ्टवेअर अंतिम टप्प्यात असून लवकरच ते लोकांसाठी उपलब्ध केले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. माझा प्रयत्न जसा इंग्लिश भाषेतील आहे त्याच पद्धतीने कोणत्याही भाषेसाठी असे सॉफ्टवेअर तयार करता येऊ शकते, असेही क्षीरसागर आवर्जून सांगतात.

Story img Loader