धूम स्टाइल वेगाने शांतता आणि सुरक्षितता धोक्यात
ठाण्यातील उपवन तलावाचा परिसर शहराच्या इतर भागांच्या तुलनेत शांत आणि वाहतूक कोंडी मुक्त म्हणून ओळखला जातो. ठाण्यातल्या गर्दीपासून शांततेचे चार क्षण पदरी पाडायचे असतील तर येथील नागरिकांची पावले उपवनच्या दिशेने वळतात. हिरवीगर्द वनराई आणि तलावाने नटलेल्या या परिसराचा शहरातील महापौरांनाही हेवा वाटतो. म्हणून की काय त्यांनीही आपला बंगला याच ठिकाणी थाटला आहे. उपवनची ही शांतता सध्या सुसाट सुटणाऱ्या काही बाइकस्वारांनी मात्र भंग केली आहे. ‘धूम’ स्टाइलने वेगावर स्वार झालेल्या बाइकस्वारांसाठी उपवनचे मोकळे रस्ते पर्वणी ठरू लागले असून शांततेच्या शोधात याठिकाणी येणाऱ्या वाटसरू मात्र यामुळे पुरते हैराण झाले आहेत, तसेच त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे.
तलावपाळीसारख्या परिसरात असलेली वाहतूक कोंडी आणि प्रदूषामुळे फेरफटका मारायला येणाऱ्या बहुतांश ठाणेकरांनी तलावपाळीला केव्हाच रामराम ठोकला आहे. तलावांचे शहर म्हणून ठाणे प्रसिद्ध आहे. मात्र, शहरातील तलावांची अवस्था लक्षात घेता विरंगुळ्यासाठी उपवनचा परिसर ठाणेकरांसाठी हॉट डेस्टिनेशन ठरला आहे. घोडबंदरसारख्या नव्याने विस्तारत जाणाऱ्या परिसरातील टोलेजंगी मॉलही नागरिकांसाठी फिरण्याचे ठिकाण ठरले आहे. हिरव्यागर्द अशा वनराईने फुललेला उपवनचा परिसर शांततेच्या शोधात निघालेल्या ठाणेकरांना अधिक भावतो. गेल्या काही वर्षांपासून उपवनच्या तलावाने तरुणाईलाही आपल्या कवेत घेतले आहे. तरुण वर्गाच्या भेटीगाठीसाठी मोक्याचे ठिकाण म्हणून उपवन परिसर ओळखला जातो. शनिवारी आणि रविवारी येथे मोठय़ाप्रमाणावर तरुणांची गर्दी पाहावयास मिळते. उपवन तलाव परिसरातील रस्त्यावर फारशी वाहतूक नसतेच. त्यामुळे ठाणे शहर एकीकडे वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडले असताना उपवनचे रस्ते मात्र रिकामे दिसून येतात. याचाच गैरफायदा शहरातील काही अतिउत्साही बाइकस्वार घेऊ लागले आहेत. उपवनच्या मोकळ्या-ढाकळ्या आणि रुंद रस्त्यांवर बाइक रेसिंगची धूम रंगू लागली असून हा प्रकार येथील रहिवाशांची डोकेदुखी बनली आहे. रेसिंगमध्ये अग्रक्रम गाठण्यासाठी वेगावर स्वार झालेले तरुणांचे टोळके पाय मोकळे करण्यासाठी आलेल्या वाटसरूंची जराही पर्वा करत नाहीत. तुफान वेगात निघालेल्या बाइक्स अपघातांना निमंत्रण ठरू लागल्या आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. असे असले तरी बाइक रेसिंगचे प्रकार मात्र थांबलेले नाहीत. हे बाइकस्वार स्वत:सोबत रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या इतरांचे जीवही धोक्यात घालत असतात. अनेकदा या बाइकस्वारांचे येथील नागरिकांशी खटकेही उडाले आहेत. या परिसरात फिरावयास येणाऱ्या काही नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र ठाण्यातील कोंडी सोडविण्यात मग्न असलेले वाहतूक पोलीस उपवनकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. त्यामुळे निसर्गाचे वरदान लाभलेल्या उपवनचे पर्यटकांना आता वावडे वाटू लागले आहे. यासंबंधी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मोबाइल उचलला नाही. स्थानिक वाहतूक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाले नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा