ठाणे जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे कायम असले तरी आता स्वातंत्र्यदिनी कल्याणमध्ये प्रांत अर्थात उपविभागीय कार्यालय कार्यान्वित होत असल्याने मुरबाड आणि कल्याण या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांचा ठाण्याचा फेरा वाचणार आहे. ठाणे जिल्ह्य़ात १५ तालुके आणि २४ विधानसभा मतदारसंघ असले तरी ठाणे, जव्हार, डहाणू, पालघर, भिवंडी आणि उल्हासनगर अशा सहाच ठिकाणी उपविभागीय कार्यालये आहेत. उल्हासनगरमधील प्रांत कार्यालय सर्वात जुने असून ते १९५० पासून कार्यरत आहे. प्रांत कार्यालयात जमिनीच्या न्यायनिवाडय़ाची प्रकरणे निकाली काढली जातात. तसेच महसुलाबाबतचे निर्णय, विविध जातीचे, उत्पन्नाचे तसेच अधिवासाच्या दाखल्यांची सत्यता पडताळून ते या कार्यालयातून वितरित केले जातात. साहजिकच ग्रामस्थ, शेतकरी तसेच विद्यार्थ्यांना या कार्यालयात यावे लागते. मुरबाड तालुक्यातील ३०० तर कल्याणमधील शंभर गावांना आतापर्यंत प्रांत कार्यालय नव्हते. त्यामुळे त्यांना उपरोक्त प्रकारच्या कोणत्याही कामांसाठी ठाण्याला यावे लागत होते. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे याविषयी पाठपुरावा केला. त्यानुसार गुरुवारी स्वातंत्र्यदिनी कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत प्रांत कार्यालय सुरू करण्यात येणार असून धनंजय सावळकर यांची उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.