गेल्या वर्षी मराठी नाटय़सृष्टीत एकामागोमाग एक जुनी गाजलेली नाटकं पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न झाले होते. यंदा मात्र नाटय़निर्मात्यांसह नाटककारांनी वेगवेगळ्या विषयांची हाताळणी करीत खूप चांगली नाटकं दिली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एखादा अपवाद वगळता नाटय़निर्माते व नाटककार यांच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांची साथ लाभली नाही..
काही नाटय़निर्मात्यांसाठी धंद्याच्या दृष्टीने २०११ खूप चांगलं गेलं होतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे या वर्षांत अनेक जुनी, गाजलेली नाटकं नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर आली आणि ‘जुनं ते सोनं’ म्हणणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी त्या नाटकांना गर्दी केली. त्या चांगल्या वर्षांतूनच स्फूर्ती घेत अनेक नवनवीन नाटककार, निर्माते आणि काही जुने-जाणते निर्माते यांनी नव्या कल्पना रंगमंचावर आणण्याचा धाडसी प्रयत्न २०१२ मध्ये केला, मात्र या प्रयत्नाला प्रेक्षकांची म्हणावी तशी साथ लाभली नाही.
२०१२ मधील डिसेंबर महिना नाटकधंद्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरत आहे. या एका महिन्यात जवळपास १३ नाटकं रंगभूमीवर येऊ घातली आहेत. विशेष म्हणजे या नाटकांमध्ये विविध विषयांची हाताळणी केलेली दिसते. त्या आधीही वर्षभरात आलेल्या नाटकांपैकी ‘लग्नाची बेडी’, ‘लेकुरे उदंड जाहली’ आणि ‘लहानपण देगा देवा’ अशा काही तीन-चार नाटकांचा अपवाद वगळता सर्व नाटकं ही नव्या संकल्पनेवर आधारित होती. त्यातही सामाजिक आशय, नातेसंबंधांतील ताणतणाव वगैरेंवर भाष्य करणारी खूपच दर्जेदार नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आली.
नाटकधंद्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे यंदा प्रशांत दामले या विनोदी अभिनेत्याने रंगभूमीवरील १० हजार प्रयोगांचा मैलाचा टप्पा पार केला. एवढे प्रयोग करणारा प्रशांत हा मराठीच नाही, तर संपूर्ण भारतीय रंगभूमीवरचा पहिला आणि एकमेव नट ठरला आहे. यंदा त्याने आणि कविता लाडने अनेक वर्षांनंतर एकत्र येत केलेल्या ‘माझिया भाऊजींना रीत कळेना’ या नाटकाने तिकीटबारीवर चांगलेच यश मिळवलं आहे.
यंदा आलेल्या नाटकांमध्ये ‘टॉम अॅण्ड जेरी’ या नाटकाचा विषय वेगळा आणि हाताळणी उत्तम होती. त्याचबरोबर ‘कोणे एके काळी’ या नाटकानेही वेगळा फॉर्म स्वीकारीत प्रेक्षकांचं मन जिंकलं. विषयांच्या बाबतीत ‘माणसा माणसा हुप’, ‘अहो राहू द्या ना घरी’, ‘मायलेकी’, ‘प्रपोझल’, ‘दुर्गाबाई, जरा जपून’ अशा नाटकांचे विषय खूपच चांगले आहेत.
मराठी नाटय़सृष्टीत काही निर्मिती संस्था सातत्याने दर्जेदार नाटय़निर्मिती करण्याकडे भर देतात. तसेच या संस्था सतत नवनवीन प्रयोग करण्याबद्दलही प्रसिद्ध आहेत. अशा नाटय़संस्थांनीही यंदा काही लक्षणीय नाटके रंगमंचावर आणली. यात ‘श्री चिंतामणी’चे ‘मायलेकी’, ‘सुयोग’चे ‘सरगम’, अशा काही संस्थांची नावे घेता येतील. मात्र प्रभाकरपंत पणशीकर यांचा वारसा सांगणाऱ्या ‘नाटय़संपदा’ने नवीन संहितेचे नाटक सादर करण्याची जोखीम न उचलता जुन्या नाटकांच्या सादरीकरणावरच लक्ष केंद्रित केले.
नेपथ्याच्या बाबतीत डिसेंबरमध्ये आलेल्या दोन नाटकांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. यातील ‘मायलेकी’ या नाटकाचा सेट हा कारागृहाचा आहे. राजन भिसे यांनी हे नेपथ्य केले आहे. तर ‘प्रपोझल’ या नाटकात प्रदीप मुळ्ये यांनी अख्खा रेल्वेचा डबा उभा करून वेगळ्याच नेपथ्याची नांदी केली आहे. अशा वास्तववादी नेपथ्यामुळे पुढील वर्षांत कदाचित नेपथ्यशैलीत चांगलाच फरक पडेल, अशी शक्यता आहे.
नाटय़सृष्टीत वेगवेगळे आणि नवनवे प्रयोग होत असताना, कलाकार, नाटय़निर्माते, दिग्दर्शक आणि नाटककार हातात हात घालून जिवाचे रान करून उत्तम नाटय़निर्मिती करत असताना प्रेक्षकांनी मात्र नाटकधंद्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र यंदा दिसले. प्रशांत दामले यांची काही नाटकं आणि ‘वाऱ्यावरची वरात’सारखी पुनरुज्जीवित नाटकं वगळता इतर नाटकांना म्हणावा तसा प्रेक्षकवर्ग लाभला नाही. त्यातल्या त्यात ‘टॉम अॅण्ड जेरी’सारख्या एखाद दोन नाटकांनी चांगली कमाई केली.
या वर्षांच्या अखेरच्या तिमाहीमध्ये मुंबई महापालिकेने आपल्या नाटय़गृहांच्या भाडय़ात १० टक्क्य़ांची वाढ करून सर्वच नाटय़निर्मात्यांना जबर धक्का दिला. ही भाडेवाढ दरवर्षी १० टक्केया प्रमाणात लागू होईल, अशी तरतूदही पालिकेने केली आहे. त्यामुळे आधीच गाळात असलेला नाटकधंदा आता रसातळाला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.