वाचनाची भूक भागविणा-या क्षेत्रात ग्रंथालय,वाचनालय ते अभ्यासिका बदल होत असताना आता त्यात नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-बुक, ई-पेपर, ई-लायब्ररी ही संकल्पना विकसित होत असल्याने वाचन संस्कृतीही प्रगत होत आहे, असे मत विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी व्यक्त केले.
शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या प्रा. श्रीराम पुजारी कलासंकुलातील अभ्यासिकेचे ‘विष्णु नारायण शिवापूरकर’ असे नामकरण फोंडके यांच्या हस्ते समारंभपूर्वक झाले; त्या वेळी ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. पी.के.जोशी हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर वाचनालयाचे सरकार्यवाह प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष प्रा. शंकरराव साळुंखे, कार्यवाह दत्ता गायकवाड, डॉ. श्रीकांत कामतकर, विष्णु शिवापूरकर यांच्या नात वसुंधरा धरमसी व जयकुमार धरमसी आदी उपस्थित होते. या वेळी अभ्यासिकेस सहा लाखांची देणगी देणा-या सुनीता राव-पाडगावकर यांच्यावतीने वसुंधरा धरमसी यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
डॉ. फोंडके म्हणाले,‘‘निसर्ग नियमाप्रमाणे बदल हा अपेक्षित असतो. त्याप्रमाणे वाचन क्षेत्रातही आमूलाग्र बदल होत आहेत. वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे रडगाणे गात बसण्यापेक्षा नवीन तंत्रज्ञानामुळे आजचा वाचकवर्ग वाढत असून विशेषत तरुण पिढी वाचनाकडे आकृष्ट होत आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. वाचनालयातून पुस्तके घरात आणून वाचणे, यामध्ये पुढचा बदल झाला असून लोक घरबसल्या आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक ई-रीडर च्या माध्यमातून वाचू शकतो. हा बदल पाश्च्यात्त्यांनी लगेच स्वीकारला. आता ही संकल्पना भारतातही मूळ धरु लागली आहे, त्याचे स्वागत झाले पाहिजे,’’ असे त्यांनी नमूद केले.
डॉ. पी. के. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. येळेगावरकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. मंजूषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उमाकांत वरेरकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, प्रा. पुष्पा आगरकर, डॉ. नभा काकडे, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीही विकसित – फोंडके
वाचनाची भूक भागविणा-या क्षेत्रात ग्रंथालय,वाचनालय ते अभ्यासिका बदल होत असताना आता त्यात नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-बुक, ई-पेपर, ई-लायब्ररी ही संकल्पना विकसित होत असल्याने वाचन संस्कृतीही प्रगत होत आहे, असे मत विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी व्यक्त केले.
आणखी वाचा
First published on: 20-08-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New technology developed reading culture phondke