सिंहस्थ, कुंभमेळा आणि रेल्वेमंत्रीपद महाराष्ट्राकडे असणे, या दोन गोष्टींमुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात जिल्ह्याच्या वाटय़ाला निश्चितपणे काहीतरी पडेल, अशी अपेक्षा रेल्वे प्रवशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सिंहस्थासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात काही सुधारणा होत असल्या तरी त्या पुरेशा प्रमाणात नसल्याने अधिक सुविधा देण्यासह काही नवीन गाडय़ा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सिंहस्थासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक नाशिक येथे येणार असून त्याचा अधिकांश भार रेल्वेवरच पडणार आहे. हा भार पेलण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकात काही सुधारणा करण्यात येत आहेत. या अनुषंगाने नाशिकसाठी नांदेड ते जोधपूर, मुंबई ते चेन्नईसाठी दैनंदिन असणारी २४ तासात पोहोचणारी एक्स्प्रेस नाशिक-मनमाड-दौंडमार्गे सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बुरड यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. उत्तर महाराष्ट्रातून जोधपूर तसेचा चेन्नईकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. परंतु त्यासाठी थेट गाडी नसल्यामुळे दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी अनेक ठिकाणी गाडी बदलणे भाग पडते. त्यातच सुमारे १० ते १५ तासांचा वेळ वाया जातो. कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर कायम स्वरुपी उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी तसेच यात्रेकरूंची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात दोन्ही गाडय़ा सुरू केल्यास प्रवाशांच्या दृष्टिने आणि रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नांदेड ते जोधपूर चोवीस तासात पोहोचणाऱ्या गाडय़ा सुरू करण्यासह उत्तर महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेल्या अनेक मागण्या रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. मुंबई लोकल सेवा इगतपुरीपर्यंत वाढविण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु या मागणीविषयी अर्थसंकल्पात अजिबात उल्लेख नसतो. इगतपुरीपर्यंत लोकल सेवा सुरू झाल्यास इगतपुरीच्या पर्यटन विकासासाठी ती मोलाची घटना ठरू शकेल. मुंबईकर सुटीच्या दिवशी ज्याप्रमाणे लोणावळ्याला जात असतात, त्याप्रमाणे ते इगतपुरीला भेट देऊ शकतील. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊ शकेल. या सर्व विषयांचा विचार करून इगतपुरीपर्यंत लोकल सेवा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा