हलक्या आणि स्वस्तातल्या चायनीज छत्र्यांबरोबरच आपल्या पेहरावाला साजेशा अशा छत्र्यांचा मोसम यंदा बाजारात दिसतो आहे.लांब दांडय़ाच्या, बॅगेत मावणाऱ्या थ्री फोल्ड, चौकोनी आकाराच्या अशा विविध प्रकारच्या छत्र्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर बाजार रंगायला सुरुवात होते. त्यात फुलांपासून ते कार्टुन्सपर्यंत असंख्य प्रिंट्स, आकार पाहायला मिळतात. त्यात आता ‘स्वस्तात मस्त’ वाटणाऱ्या चायनीज छत्र्यांची भर पडली आहे. या छत्र्या बॅगेत मावण्याच्या दृष्टीने सोयीच्या असल्यामुळे महिलांकडून त्यांना पसंती असते. स्वस्त असल्यामुळे एखाददुसरे वर्ष जरी या छत्र्या टिकल्या तरी ग्राहकांना परवडणारे असते. त्यामुळे या छत्र्यांची मागणी वाढली आहे. बाजारात या छत्र्या साधारणपणे ८० रुपयांपासून मिळतात. दुसरीकडे छोटय़ा बुटिक्समध्येही मुलींसाठी त्यांच्या बॅग्स आणि पेहरावाला साजेशा आकर्षक रंगाच्या छत्र्याही विक्रीस आहेत. त्यांच्या किमतीही ३०० रुपयांपासून आहेत. मोठय़ा दांडय़ांच्या आकर्षक छत्र्याही लक्ष वेधून घेतात. मध्यम दांडय़ाच्या छत्र्यांची मागणी थोडीफार कमी झाल्याने त्याही १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षीचा साठा विक्रीला
अर्थात जूनचा दुसरा आठवडा उजाडला तरी छत्र्यांच्या खरेदीला म्हणावा तसा जोर आलेला नाही. पाऊस पडण्याची काही चिन्हेच दिसत नसल्यामुळे काही दुकानदारांनी दुकानात नवा माल भरण्याऐवजी मागच्या वर्षीचा छत्र्यांचा साठा संपविण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे छत्र्यांचा रंगीतपणा काहीसा ओसरला आहे. पाऊस येणार म्हणून नव्या छत्र्या विकत घेण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांना या मागच्या वर्षीच्या छत्र्यांवरच समाधान मानावे लागणार आहे. परंतु, गंज लागणे, रंग फिकट पडणे, कपडा उसविण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी काळजीपूर्वक खरेदी करायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा