मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय, दमदार कलावंत आणि वैशिष्टय़पूर्ण मांडणी यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजत आहेत. अनेक नवे दिग्दर्शक, तंत्रज्ञ, छायालेखक, कलावंत, निर्माते मराठी सिनेमात येत आहेत. या बदलाची नोंद घेऊन मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ मुंबईतील अमराठी प्रेक्षकांनाही पाहायला मिळावेत आणि चांगल्या मराठी चित्रपटांचे महत्त्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स अर्थात एनसीपीएच्या वतीने ‘नवे वळण’ हा मराठी चित्रपटांचा महोत्सव केला जातो. यंदाचा महोत्सव शुक्रवारपासून सुरू झाला आहे.
यंदाच्या महोत्सवात उमेश कुलकर्णी निर्मित आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘पुणे ५२’, सतीश मन्वर दिग्दर्शित ‘तुह्या धर्म कोणचा?’, सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘पोपट’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित व राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘अनुमती’, नुकताच प्रदर्शित झालेला अजय नाईक दिग्दर्शित ‘लग्न पाहावे करून’, राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल एक प्रवास’, गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘टुरिंग टॉकीज’,  हे चित्रपट ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान एनसीपीएच्या लिट्ल थिएटरमध्ये दाखविण्यात येतील.
प्रत्येक मराठी सिनेमाचा वेगळा विषय आणि दिग्दर्शकाची वेगवेगळी शैली तसेच सिनेमाकडे गंभीरपणे पाहणाऱ्या सर्वाचा सहभाग अशा निकषांवर नवे वळण महोत्सवातील चित्रपट निवडण्यात आले आहेत. शनिवारी-रविवारी दोन्ही दिवस दुपारी ३ आणि सायंकाळी ६ वाजता खेळ होणार असून सोमवार व मंगळवार असे दोन्ही दिवस संध्याकाळी ६.३० वाजता एक खेळ होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिला जात असून कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. अनेकदा चित्रपटगृहातून मराठी चित्रपट एक-दोन आठवडय़ात निघून जातात. त्यामुळे असे चित्रपट या महोत्सवांतर्गत पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे.  

Story img Loader