सिडकोच्या स्थापनेपासून महिलांना अध्यक्ष किंवा संचालक पदापासून दूर ठेवणाऱ्या सत्ताधारी पक्षांना आता सिडकोच्या संचालक पदावर एक महिला संचालक नियुक्त करावी लागणार आहे. तसा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला असून तो मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या एक पदासाठी काँग्रेसच्या अमरावती जिल्ह्य़ातील आमदार यशोमती ठाकूर यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या कोटय़ातील एक संचालक पद अद्याप रिक्त आहे.
सिडकोची स्थापना कंपनी कायद्यानुसार करण्यात आली असून राज्य शासनाचे या कंपनीत सर्व भागभांडवल आहे. त्यामुळे बारा जणांच्या संचालक मंडळात सध्या आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन संचालक नियुक्त करण्यात आले आहेत. आघाडी सरकारच्या धोरणानुसार हे महामंडळ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आल्याने त्या पक्षाचा अध्यक्ष नियुक्त करण्यात आला असून त्यांना मंत्री दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील या महामंडळावर ४४ वर्षांत अध्यक्ष किंवा संचालक पदावर एकही महिलेला संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले नाही. सिडकोचे दोन सनदी अधिकारी, नगरविकास विभागाचे दोन उच्च अधिकारी, कोकण विभाग, नवी मुंबई पालिका, जेएनपीटी, एमएमआरडीएमधील सनदी अधिकाऱ्याशिवाय काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी या महामंडळावर नेमले जातात. महिलांना समान अधिकार देणाऱ्या पुरोगामी आघाडी सरकारने अद्याप या महामंडळावर एकही महिला संचालक नियुक्त न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव व वसंत भोईर यांना संचालक म्हणून संधी मिळाली असून त्यापैकी हिंदुराव अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. काँग्रेसच्या कोटय़ातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय नामदेव भगत यांनी दोन टर्म बाजी मारली  असून काँग्रेसची एक जागा गेली अनेक वर्षे रिक्त आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळात एक शासन नियुक्त महिला प्रतिनिधीचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. तो अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काँग्रेसच्या कोटय़ातील एक पद भरण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत आहे. त्यासाठी अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा होत आहे.

Story img Loader