१८६३ नंतर पहिल्यांदाच नवीन वर्षांचा पहिला दिवस आणि मंगळवार असा दुग्धशर्करा योग साधत आलेल्या यंदाच्या अंगरिका चतुर्थी निमित्त अंगारकी चतुर्थाच्या निमित्ताने श्रीगणेशाच्या दर्शनासाठी टेकडीच्या गणेश मंदिरात श्रीगणेशाच्या दर्शनासाठी भक्तांची मंगळवारी प्रचंड गर्दी उसळली. परंतु, महापालिकेने स्वच्छता व पोलीस यंत्रणेने व्यवस्थेच्या दृष्टीने गांभीर्याने लक्ष न दिल्याने भक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला.  
तब्बल १४९ वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगाचा लाभ घेण्यासाठी शेकडो भक्तांनी भल्या पहाटे टेकडीचे गणेश मंदिर गाठले. सकाळपासूनच गणेश भक्तांची मंदिरात गर्दी झाली. सकाळी साडेनऊ वाजता मानस चौकापासून मंदिरापर्यंत गर्दीचा ओघ वाढला. पायी चालणेही कठीण झाले होते. मंदिरात गर्दीमुळे कसेबसे का होईना दर्शन होत होते. मंदिर व्यवस्थापनाने मात्र, पुरेशी व्यवस्था केली होती. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था उड्डाण पुलाखालीच ठेवण्यात आली. प्रवेशद्वारापासूनच महिला व पुरुषांना दर्शनासाठी स्वतंत्र मार्ग करण्यात आला. बाहेर पडण्याचा मार्ग अपुरा पडला.  एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भक्तांची गर्दी होणार असल्याची महापालिका वा पोलीस यंत्रणेला माहिती असली तरी या दोन्ही यंत्रणांनी गांभिर्याने न घेतल्याने नागरिकांना तसेच पोलिसांनाही त्रास भागावा लागला. गणेश भक्तांची बेशिस्तसुद्धा त्यास कारणीभूत ठरली. टेकडी गणेश मंदिर ते मानस चौकदरम्यान गटारात पाईप फुटल्याने तसेच काही पावलांवरील स्वच्छता गृहातून रस्त्यावर वाहत असलेल्या अस्वच्छ पाण्यातून गणेश भक्तांना जावे लागत होते. गेल्या काही दिवसांपासून पाणी वाहत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.   गणेश भक्तांमध्येही शिस्त नव्हती. मंदिर परिसरात प्रसादासाठी रांग लागली असली तरी अनेक सुशिक्षित महिला-पुरुष, तरुणी थेट काऊंटरवर (सकाळी साडेदहा वाजता) धडकत होते. त्यामुळे प्रत्यक्ष काऊंटरवर गर्दी झाली. वाहने पार्किंग करतानाही बेशिस्तीचे दर्शन घडले. मानस चौकात रेल्वे मार्गाच्या भिंतीला कोपऱ्यात पुरेशी जागा आहे. तेथे फारतर दुहेरी पार्किंग शक्य आहे. वास्तविक काही पावलांवर माहेश्वरी सभागृहाजवळील मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था असते. गणेश भक्तांनी रेल्वे स्थानक ते मानस चौक या रस्त्यावर रस्त्याच्या एका बाजूने तसेच मानस चौकाच्या चारही बाजूस रस्त्याच्या कडेला चौहेरी पार्किंग केल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना व परिणामी पादचाऱ्यांना वाट काढणे मुश्किल झाले होते. सकाळी दहा वाजताच्या सुमारास भक्तांच्या प्रचंड गर्दीने मात्र मानस चौक तसेच रेल्वे स्थानकाजवळ वाहतूक खोळंबली होती.   रेल्वे स्थानक ते मानस चौक हा रस्ता बंद न केल्याने वाहने मंदिरापुढून जात होती. आधीच गर्दी आणि त्यात वाहनांमुळे या रस्ताने पायी चालणेही मुश्किल झाले. एका नागरिकाने सकाळी साडेअकरा वाजता दक्षिण विभागाच्या वाहतूक पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महापालिका व वाहतूक पोलीस या दोन्ही यंत्रणांनी व्यवस्था गांभीर्याने केली नसल्याचे उघड झाले. वाहतूक पोलीस उपायुक्त जीवराज दाभाडे यांनी जातीने स्वत: लक्ष घातल्यानंतर अकरावाजेनंतर त्या परिसरात वाहतूक सुरळीत झाली. तीळी चतुर्थीला टेकडीच्या गणेश मंदिरात यात्रा असते त्यावेळीदेखील प्रचंड गर्दी उसळते.

Story img Loader