लातूर महापालिकेने २१ कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी भरली नसल्यामुळे महावितरणने पथदिव्यांची वीज खंडित केली. दि. ३१ डिसेंबरपासून लातूरकरांना रात्रीचा सामना अंधारात करण्याची वेळ आली आहे.
लातूर शहरात भुरटय़ा चोऱ्यांचे प्रमाण दिवसाचं जास्त आहे. सायंकाळपासून रस्त्यावरील वीज खंडित राहते. त्यातच आता चोरटय़ांच्या मदतीला अंधार धावून आला आहे. सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत होणारी गर्दी पथदिवे बंद असल्यामुळे चांगलीच रोडावली आहे. वर्षांच्या प्रारंभीच अंधाराला अशा प्रकारे सामोरे जावे लागत असल्यामुळे नवे वर्ष कसे जाणार, याची चुणूक पाहावयास मिळत आहे. ‘तीन तेरा नऊ अठरा’ या आकडय़ांचे गणित मांडले जात आहे!
शहराची लोकवस्ती सुमारे ४ लाख आहे. शहर मोठय़ा प्रमाणावर विस्तारले आहे. रस्त्यांची अवस्था चांगली नाही. त्यात रात्री वीज नसली तर चोऱ्यांबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढणार आहे. तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिका यासंबंधी तूर्त तरी काही करू शकत नाही. व्यापाऱ्यांनी एप्रिलपर्यंत एलबीटी न भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पालिकेला दिले जाणारे सर्व अनुदान नोव्हेंबरपासून बंद केले आहे. व्यापाऱ्यांप्रमाणेच नागरिकांनीही एकदा कचरा, पाणी व अन्य नागरी सुविधा पालिका नीट देत नसल्यामुळे आम्ही करच भरणार नाही, अशी भूमिका घेतली की उत्पन्नाचे सर्व स्रोत थांबतील. पालिकेचा कारभार ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ असा असला, तरी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. प्रत्येक बाबतीत इतरांना दोष देण्याच्या वृत्तीमुळे समस्या सुटण्याऐवजी त्या वाढत आहेत.

Story img Loader