नववर्षांच्या पूर्वसंध्येला रस्त्यावर धिंगाणा करणारे काहीजण असतात. पण औरंगाबादमधील शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी एक पंचतारांकित हॉटेलात रात्री दीडच्या सुमारास ‘राडा’ केला. मद्यधुंद अवस्थेत एखाद्या महिलेच्या हाताला धरून कोणी डान्स कर, असा बळजबरीने आग्रह करत असेल तर शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणी दिली. तर महापालिकेत भाजपने सर्वसाधारण सभेवर टाकलेला ‘बहिष्कारा’चा मुद्दा वैयक्तिक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक संजय केनेकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभारामुळे निर्माण झालेली सेना-भाजपमधील तेढ वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित हॉटेलात नववर्षांच्या पूर्वसंध्येला अनेकांनी मोठी गर्दी केली होती. काही महिला, तरुणी व युवक नृत्यही करत होते. रात्री १२ वाजेपर्यंत असेच वातावरण होते. त्यानंतर नववर्ष साजरे करण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आले होते. या घटनेची माहिती देताना ते म्हणाले, ‘माझा वाढदिवस व नववर्षांची पूर्वसंध्या साजरी करण्यासाठी आम्ही कुटुंबीयांसह हॉटेलमध्ये गेलो होतो. तेथे कोणी मद्यधुंद अवस्थेत एखाद्या महिलेला नृत्य कर असे म्हणत असेल तर शिवसैनिक कसा गप्प बसेल?’ मद्यधुंद अवस्थेतील हा व्यक्ती नगरसेवक संजय केनेकर होते, हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. दुसरीकडे केनेकर यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. ‘रात्री दीडच्या सुमारास खासदार चंद्रकांत खैरे यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी पुढे गेलो होतो. तेव्हा महापौर कला ओझाही उपस्थित होत्या. तुमच्या शुभेच्छा नकोत, असे म्हणत ते माझ्या अंगावर धावून आले आणि मला जिवे मारण्याची धमकी दिली’ असे केनेकर म्हणाले. खासदार खैरे आणि नगरसेवक केनेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यांनी एकमेकांची गचांडी पकडली होती, अशी चर्चा शहरात दिवसभर होती. दोन नेत्यांमधील हा वाद राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे आज खासदार चंद्रकांत खैरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी होती. या गर्दीतही ‘नक्की काय झाले आणि कसे झाले’ याची विचारणा होत होती. सांगणाऱ्यांची आणि ऐकणाऱ्यांची कुजबूज याच विषयावर होती.
महापालिकेत सध्या शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमधील वाद विकोपाला गेले आहेत. संजय केनेकर यांनी महापौर कला ओझा ‘निष्क्रिय’ असल्याचा आरोप केला होता. त्या पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेत नाही. युतीने दिलेला वचननामा पाळला जात नाही, असा आरोप करत भाजपने सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उगारले होते. या पाश्र्वभूमीवर खासदार खैरे यांनी धमकावल्याचा आरोप नगरसेवक केनेकर यांनी केला आहे. या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही एक बैठक झाली. केनेकर यांच्या झालेल्या मानहानीबाबत समन्वय समितीत चर्चा केली जाईल, असे शहर जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे यांनी सांगितले.
खैरे म्हणतात, ‘कोणी मद्यधुंद अवस्थेत एखाद्या महिलेला डान्स कर म्हणत असेल तर शिवसैनिक गप्प कसा बसेल?’
केनेकर म्हणतात, बहिष्काराच्या प्रकरणामुळे जिवे मारण्याची धमकी दिली.
रस्त्यावरचा ‘राडा’ पंचतारांकित हॉटेलात; महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची तेढ वाढली.

Story img Loader