रांगोळ्यांची आकर्षक सजावट.. ढोल-ताशांचा गजर.. त्यावर लेझिम पथकाने धरलेला ताल.. महिलांकडून घातल्या जाणाऱ्या फुगडय़ा.. झाशीची राणी, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आदींच्या वेशभूषेत सहभागी झालेले विद्यार्थी.. मल्लखांबावर चित्तथरारक प्रात्यक्षिके.. महिलांकडून स्त्री भ्रुण हत्येवर पथनाटय़ाचे सादरीकरण.. कुठे पाणी बचतीचा तर कुठे पर्यावरण संवर्धनाचा संदेश.. अशा अभुतपूर्व उत्साहात शहरी भागात नववर्ष स्वागत यात्रांनी हिंदु नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचे स्वागत झाले असले तरी दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या ग्रामीण भागात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या मुहुर्तावर सोने, वाहन व तत्सम खरेदीसाठी नेहमीप्रमाणे उत्साह दिसला नाही. शहरी भागात ग्राहकांचा काहीअंशी प्रतिसाद लाभला असला तरी ग्रामीण भागात मात्र तसे वातावरण पहावयास मिळाले नाही.
हिंदु नववर्षांचे स्वागत यात्रांच्या माध्यमातून करण्याची परंपरा आता नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील इतरही काही भागात रुजू लागली आहे. नाशिकमध्ये तर बहुतांश भागात गुरूवारची पहाट स्वागत यात्रांनी मोहरून गेल्याचे अनुभवायास मिळाले. अगदी पहाटेपासूनच बच्चे कंपनीसह लहान-मोठय़ांची लगबग सुरू झाली होती. इंदिरानगर, राणेनगर, चेतनानगर, सिडको,
गंगापूररोड, महात्मानगर, तिडके कॉलनी, संभाजी चौक, कॉलेज रोड, अशोकनगर, सातपूर कॉलनी, जाधव संकुल आदी परिसर भागात स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले. गुढीचे पूजन करून स्वागत यात्रांना प्रारंभ झाला. शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणिय सहभाग हे यंदाचे वैशिष्ठय़े म्हणावे लागेल. राणेनगर भागातून निघालेल्या स्वागत यात्रेत अभिनेते शरद पोंक्षे तर गंगापूररोडवरील स्वागत यात्रेत पश्चिम प्रभागाचे सभापती डॉ. राहुल आहेर व नगरसेविका सीमा हिरे सहभागी झाले होते. सिडको, राणेनगर परिसरातून निघालेल्या स्वागत यात्रेद्वारे दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे महत्व पटवून देण्यात आले. मॉर्डन हायस्कूलचे शेकडो विद्यार्थी पाणी बचतीचे फलक हाती घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. पाणीच नाही तर काय होणार, पाणी वाचवा, असे संदेश फलकांच्या माध्यमातून देण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाने वन्य प्राण्यांसाठी थोडेफार पाणी शिल्लक ठेवा, असे आवाहन केले. गंगापूर रोड, कॉलेजरोड व महात्मानगर परिसरातून निघालेल्या स्वागत यात्रांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
स्वागत यात्रा ज्या ज्या मार्गावरून मार्गस्थ झाल्या, त्या त्या ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. अनेक स्वागतयात्रांमध्ये चित्ररथ सहभागी झाले होते. काही ठिकाणी महिलांनी अश्वाचे सारथ्य केले. कुठे मल्लखांबची प्रात्यक्षिके तर कुठे सायकलस्वारांचे खास पथक, ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या यात्रांमध्ये लेझिम पथकांचाही लक्षणिय सहभाग राहिला. त्यांच्या सोबतीला होते, शिवाजी महाराज, मावळे, स्वामी विवेकानंद, झाशीची राणी असे विविध वेशभूषा साकारणारे विद्यार्थी. नागरिकांनी सहभागी होऊन नववर्षांचे उत्साहात स्वागत केल्याचे पहावयास मिळाले. यात्रांमध्ये यशवंत व्यायामशाळा, नवरचना ट्रस्ट, विद्या प्रबोधिनी, राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, कॉलेज ऑफ नर्सिग आदी शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, देवदत्त जोशी, नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष के. जी. मोरे, किशोर वीग आदी उपस्थित होते.
वेगवेगळ्या भागातून निघालेल्या शोभायात्रा एका विशिष्ट भागात एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा समारोप करण्यात आला. दरम्यान, घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षांचे स्वागत करण्यात आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात तसा उत्साह पहावयास मिळाला नाही. सध्या उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाग दुष्काळाचा सामना करत आहेत. पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने शांततेत हा सण साजरा करणे पसंत केले.
खरेदीला संमिश्र प्रतिसाद
साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदीसाठी दरवर्षी बाजारपेठेत दिसणाऱ्या उत्साहावर यंदा दुष्काळाने विरजण टाकल्याचे अधोरेखीत झाले. या मुहुर्तावर सोने, घरकुल, वाहन वा तत्सम खरेदीला प्राधान्य दिले जाते. शहरी भागातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची चहलपहल काही अंशी दिसली असली तरी ग्रामीण भागात मात्र दुष्काळाचे सावट पसरले होते. व्यावसायिकांच्या मतेही खरेदीला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले जात होते. या दिवशी ग्राहकांना आत्कृष्ट करण्यासाठी व्यावसायिकांनी प्रसिद्धी तंत्राचा पुरेपुर वापर केला. परंतु, पाण्याअभावी यंदा माहोल पूर्णपणे बदलला आहे. त्याचाही व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी मान्य केले.