गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथे नववर्ष स्वागतासाठी आयोजित करावयाच्या कार्यक्रमांविषयी चर्चा करण्यासाठी रविवारी प्रसाद मंगल कार्यालयामागील पारनेरकर महाराज सभागृहात सायंकाळी सहा वाजता बैठक होणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील गंगापूर रोडवर तीन वर्षांपासून नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा ११ एप्रिल रोजी गुढीपाडवा येत असून त्याची तयारी स्वागत समितीच्या वतीने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून लायन्स क्लब येथे अखिल भारतीय आयुर्वेद व्यासपीठाचे कार्याध्यक्ष डॉ. विनय वेलणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ. वेलणकर यांनी डोंबिवलीत १४ वर्षांपासून भरविण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेची माहिती दिली. केवळ नववर्षांच्या शोभायात्रेकरिताच डोंबिवलीकर एकत्र येत नाहीत तर १४ वर्षांपासून एकमेकांशी विचारांचे व नात्यांचे संबंध घट्ट झाल्यानेच हे शक्य झाले आहे. गुढीपाडव्याला डोंबिवली येथे अडीच लाख लोक सहभागी होतात. यामागील मुख्य उद्देश माणूस जोडणे हाच असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष के. जी. मोरे, दादा रत्नपारखी, डॉ. विनय वेलणकर, लक्ष्मण सावजी, नगरसेवक अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.