नववर्षांच्या स्वागताचे पर्व सर्वत्र मोठय़ा उत्साहात सुरू असताना लातूरमध्ये मात्र आगळय़ा पद्धतीने नववर्षांचे स्वागत केले जाणार आहे. बुधवारी (१ जानेवारी) सकाळी सव्वानऊ वाजता शहरातील सुमारे दीडशे ठिकाणी राष्ट्रगीत गायले जाणार असून, आपण जेथे आहोत तेथेच थांबून ५२ सेकंद देशासाठी द्यावेत व एकसुरात राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या उपक्रमात किमान एक लाख लातूरकर सहभागी होतील, असा प्रयत्न आहे.
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने तीन वर्षांपूर्वी आमदार अमित देशमुख यांनी लातूर फेस्टिव्हलची सुरुवात केली. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सुरू झालेला हा उत्सव लातूरकरांनी आपला मानला. नववर्षांचे स्वागत राष्ट्रीय ऐक्याला साद घालणारे हवे, या संकल्पनेतून एकाच वेळी शहरातील प्रत्येक चौकात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याची कल्पना समोर आली. गेल्या १५ दिवसांपासून लातूर फेस्टिव्हलमधील कार्यकत्रे या उपक्रमाच्या तयारीला लागले आहेत. देशात इतरत्र कोठेही असा उपक्रम झालेला नाही.
फेस्टिव्हल संयोजन समितीचे अध्यक्ष संजय अयाचित व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, मदरसे, मशीद, मंदिर, चर्च, बौद्धविहार, बँक, पेट्रोलपंप, रुग्णालये याचबरोबर शहराच्या प्रत्येक चौकात सामूहिक राष्ट्रगीत गायन व्हावे, याचे नियोजन केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या उपक्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गल्लोगल्ली रिक्षा फिरवल्या जात आहेत. पोस्टर्स, पत्रके लोकांच्या हाती दिली जात आहेत. शहरातील वसतिगृह, शिकवणीवर्ग यांचाही सहभाग घेतला जात आहे.