महापालिकेच्या माध्यमातून समाजाला मदत करून इच्छिणाऱ्याा कॉर्पोरेट तसेच सामाजिक संस्थांना एकाच ठिकाणाहून पूर्ण मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत केईएम रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. ३.७ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण होऊ शकेल.
केईएममध्ये नवजात बालकांसाठी ३० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. मात्र मुंबईसह राज्यभरातून उपचारांसाठी येत असलेल्या बालकांसाठी ही क्षमताही कमी पडते. या विभागातील बालकांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के असून देशभरातील इतर कोणत्याही रुग्णालयापेक्षा ते अधिक आहे. या विभागाचे विस्तारीकरण तसेच अद्ययावत यंत्रांद्वारे नुतनीकरण करण्याचा प्रकल्प सीएसआरअंतर्गत खासगी कंपनीच्या सहभागातून हाती घेण्यात आला आहे. अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असलेली व्हेंटिलेटर्स, वॉर्मर्स, इन्फ्युजन पंप, फोटो थेरपी युनिट, बॉडी कूिलग युनिट, एअरफ्लो यंत्र, ऑक्सिजन मॉनिटर अशी यंत्रे या प्रकल्पातून उपलब्ध होतील. माझगाव डॉक आणि पालिकेमधील या प्रकल्पाच्या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या.
महापालिकेच्या रुग्णालयातून दरवर्षी हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. यासाठी पालिकेला विविध स्तरावर मदतीची आवश्यकता असते. रुग्णालयासाठी आवश्यक सोयीसुविधा तपासून त्याप्रमाणे सीएसआरअंतर्गत मदत केली जाईल, असे पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader