आतापर्यंत कोणी ओळखतही नसलेल्या नवनिर्वाचित महापौर स्नेहल आंबेकर यांना महापालिकेत प्रथम क्रमांकाची नगरसेविका ठरवल्याने प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील एकूणच प्रक्रियेबाबत शंका उपस्थित होत आहे. या अहवालात हेमांगी वरळीकर यांना दुसरा क्रमांक तर लाच स्वीकारल्याप्रकरणी फरार असलेले नगरसेवक अॅड. ज्ञानमूर्ती शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
नगरसेवकाचे शिक्षण, पालिका सभांमधील उपस्थिती, विचारलेले प्रश्न, प्रश्नांचे महत्त्व, विकासनिधीचा वाटप तसेच विभागातील १०० नागरिकांची मते घेऊन हे गुण देण्यात आले आहेत. महापौर आंबेकर यांनी प्रभाग समितीत प्रश्न विचारले तसेच मतदारांच्या प्रश्नांची तड लावल्याचे त्यांच्या प्रभाग समितीतील इतर नगरसेवकांनाही माहिती नसल्याने ही गुप्त माहिती प्रजा फाउंडेशनने कशी शोधून काढली यावर मतमतांतरे व्यक्त होत आहेत.
शहराच्या प्रमुख प्रश्नांबाबत निर्णय घेणाऱ्या स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट, आरोग्य, विधी, स्थापत्य, वृक्ष प्राधिकरण यापकी एकाही समितीच्या सदस्य नसलेल्या तसेच पालिका सभागृहात दोन वर्षांत सहा प्रश्न विचारणाऱ्या स्नेहल आंबेकर नेमके कुठे आणि कोणते प्रश्न विचारत होत्या याची माहिती अहवालात देण्यात आलेली नाही. प्रजा संस्था नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेते, जे नगरसेवक या कार्यशाळांना उपस्थित राहतात तसेच संस्थेच्या प्रतिनिधींना योग्य प्रतिसाद देतात, त्यांना अहवालात अधिक गुण देण्यात आल्याचे दिसते.
प्रजा फाउंडेशनच्या गुण देण्याच्या पद्धतीबद्दलही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा दर्जा प्रजाच्या प्रतिनिधींच्या मतांवर अवलंबून आहे. रस्ते, पाणी, आरोग्य अशा विषयावरील प्रश्नांना अधिक गुण दिले जातात, प्रजाचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले. मात्र नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नानंतर नेमकी काय कार्यवाही होते, नगरसेवकांनी त्यांच्या विभागात कोणती विकासकामे केली, निधीचा सुयोग्य वापर केला का या कळीच्या प्रश्नांना या अहवालात स्थान नाही. त्यामुळे प्रजाच्या अहवालात पहिल्या दहा क्रमांकात अनेक अनोळखी नगरसेवक दिसत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा