ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून महापालिकेने अल्मेडा, मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील चौकात उड्डाण पूल उभारण्यासाठी नव्याने प्रस्तावाची आखणी सुरू केली आहे. यापुर्वी या पुलांच्या उभारणीसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला होता. मात्र, ऐनवेळेस महमंडळाने मदतीचा हात आखडता घेतल्याने तिन्ही उड्डाण पुलांचे प्रस्ताव बारगळले होते. अखेर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिल्याने महापालिकेने या पुलांच्या उभारणीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे.
ठाणे शहरात अरुंद रस्ते, वाहन तळांचा अभाव आणि नियोजनाचे वाजलेले तीन तेरा, यामुळे शहर वाहतूक कोंडीचे आगार बनले आहे. रेल्वे स्थानक, तलावपाळी, गोखले मार्ग, अल्मेडा चौक, मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप या मूळ शहरांतील प्रमुख केंद्रांवर दररोज मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र असते. या भागात रस्ता रुंदीकरणास फारसा वाव नसल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी, तीन उड्डाण पुलांचा प्रस्ताव आखला होता. वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार नौपाडा, अल्मेडा आणि मीनाताई ठाकरे चौकात दररोज सुमारे २५ हजारांहून अधिक वाहनांची ये-जा असते. यामुळे या मार्गावर उड्डाण पूल उभारल्यास वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळू शकेल, असा निष्कर्ष महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे काढला आहे. या अहवालानुसार, ठाणे महापालिकेने सुमारे १०० कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल मध्यंतरी तयार केला होता. या रकमेच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य रस्ते विकास महामंडळाने हे उड्डाण पूल उभारण्यासाठी स्वारस्य दाखवत या प्रस्तावावर अभ्यास सुरू केला होता. मात्र, काही वर्षे चर्चेच्या गुऱ्हाळानंतर रस्ते विकास महामंडळाने निधी उभारण्यास नकार दर्शविला. त्यामुळे उड्डाण पुलांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प बारगळतात की काय, अशी चिन्हे निर्माण झाली होती.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हे प्रकल्प उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. ठाणे महापालिकेस यासंबंधी नुकतेच एक पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत. नव्या प्रस्तावानुसार, या उड्डाण पुलाचा खर्च १५० कोटींपेक्षा अधिक असण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना सल्लागाराची नेमणूक करावी का, याचा विचारही महापालिका स्तरावर सुरू आहे. नव्या प्रस्तावानुसार, नौपाडा पोलीस ठाणे ते जिजामाता उद्यान, मखमली तलाव ते वंदना सिनेमागृह आणि गोकुळनगर ते सिद्धी हॉल तसेच बाबूभाई पेट्रोल पंप अशा तीन ठिकाणी उड्डाण पूल उभारले जाणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा