आजच्या काळात विस्तारत जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात लोकांना आवडते ते देण्यापेक्षा एखाद्या गोष्टीची आवड त्यांच्यामध्ये रुजविण्याचे काम वृत्तपत्रांनी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. येथील आचार्य अत्रे कट्टय़ाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
पत्रकारितेत ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर हे आपले आदर्श असून ज्या दिशेने वारा वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेने पत्रकाराची नजर असावी ही तळवळकरांची शिकवण आपण आजही ध्यानात ठेवली आहे असेही कुबेर यांनी सांगितले. समाजातील स्वघोषित ‘भाईंना’ अस्वस्थ करणे, त्यांच्या चुकीच्या कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने लिखाण करणे यातूनच पत्रकारितेचा खरा आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इंडियन एक्स्प्रेस, हिंदूू आणि टेलिग्राफ यांसारखे काही मोजके वृत्तसमूहच ‘ओल्ड स्कूल’ पत्रकारिता करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जे घडत आहे त्यामागचा खरा अर्थ काढून दाखविण्याचे काम पत्रकाराने करावे. तसेच पत्रकारितेत वाढायचे असेल तर दहा विषयांमध्ये रस आणि एकात गती असणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. टीव्ही माध्यमाचा आवाका हा खूप लहान असून त्याच्याशी कधीही स्पर्धा करायला जाऊ नये. तसेच टीव्ही पत्रकारितेने वर्तमानपत्रांचा ‘अजेंडा’ ठरविता कामा नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेसमेंट (एफडीआय) हे यायलाच हवे. सरकारच्या या निर्णयाला विरोध करणे हा केवळ बालिशपणा असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांवरून समजावून सांगितले. मोठय़ा प्रमाणावर करावी लागणारी तेलाची आयात, आयात-निर्यात व्यापारातील तूट आणि चलन वाढ यामुळे महागाई कमी होणे शक्य नाही. यामुळे महागाई कमी होण्याची वाट बघण्यापेक्षा उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.

Story img Loader