सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे २०० कोटी खर्चाच्या ३८ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी पुढील वर्षांत पूर्ण होणार आहे. २०० टनांचा आणि ११० केजी दाबाचा एकच बॉयलर तसेच ३८ मेगावॉट वीजनिर्मितीचे टर्बाईन असलेला राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांतील ‘सिद्धश्वर’चा हा एकमेव वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहे.
या प्रकल्पाच्या नियोजित कामाचे भूमिपूजन कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते धार्मिक विधीने मंगलमय वातावरणात करण्यात आले. या प्रकल्पाच्या कामासाठी अविज इंडिया कंपनीची ११ टक्के  कमी दराने निविदा मंजूर करण्यात आली असून, यात ९० मीटर उंच चिमणीचा समावेश असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वनाथ हिरेमठ यांनी स्वागत व प्रास्ताविकेत दिली.
या वेळी धर्मराज काडादी यांनी हा सहवीजनिर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण होणार नमूद करीत, या प्रकल्पातील विविध कामांसाठी दर्जेदार आणि प्रतिष्ठित कंपन्यांचाच समावेश करण्याचा निर्धार बोलून दाखविला. अविज इंडिया कंपनीने राज्यात सहवीजनिर्मितीच्या २३ प्रकल्पांचे काम केले आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्यात केवळ दर्जेदार व गुणात्मक कामांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे येथे काम करण्यास मोठा उत्साह येतो. कामाची निविदा ११ टक्के कमी दराने मंजूर होण्याचा उच्चांक असून, हा ‘सिद्धेश्वर पॅटर्न’ असल्याचे अविज कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय कुलकर्णी यांनी सांगितले.
 

Story img Loader