सिकलसेल उपचारासंबंधी राज्य सरकार गंभीर असून नागपुरात पुढील वर्षी सिकलसेल रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फौजिया खान यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.
जयवंत जाधव, हेमंत टकले, रमेश शेंडगे, अनिल भोसले, यांनी नियम १०१ नुसार लक्षवेधी सूचना मांडली. नागपूरसह राज्यातील वीस जिल्ह्य़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात सिकसेलचा प्रादुर्भाव झाला आहे. या आजारावर कायम औषध नसल्याने रुग्णांचे हाल होतात. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा उपाय असला तरी तो महागडा आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे अधिक हाल होतात. फक्त सिकलसेल आजारावर उपचारासाठी शासनातर्फे उपाययोजनेची गरज सदस्यांनी व्यक्त केली.
शोध, चाचणी, समुपदेशन न उपचार अशा चार स्तरावर राज्यातील वीस जिल्ह्य़ांत टप्प्याटप्प्याने मोहीम राबविली जात आहे. राज्यात ८७ हजार ७१० वाहक रुग्ण आढळले. सिकलसेल वाहकांचे विवाह टाळणे महत्त्वाचे आहे. वीस जिल्ह्य़ांमध्ये ९४७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोल्युबिलिटी चाचणी व प्राथमिक चाचणीची सोय उपलब्ध आहे. ८८ ग्रामीण/उपजिल्हा/स्त्री व जिल्हा रुग्णालयांमध्ये इलेक्ट्रोफोरेसिस चाचणीची सोय करणयात आली आहे. हायपरफॉन्स लिक्विड क्रोमोटोलॉजी चाचण्या तसेच मोफत रक्त संक्रमण, औषधोपचार आदी सेवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. गंभीर सिकलसेल रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयांमध्ये एकूण १८ ठिकाणी डे केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून तेथे कंत्राटी समुपदेशक नियुक्त करण्यात आला आहे.
सिकलसेल उपचारासाठी सहा रुग्णालये सुरू केली जात असून नागपुरात पुढील वर्षी रुग्णालय सुरू केले जाणार असल्याचे फौजिया खान यांनी सदनात सांगितले.