निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांची कामे यावर्षी पूर्ण होतील व पुढील वर्षीच्या पावसाळ्यात निळवंडेचे पाणी अकोले तालुक्यातील शेतीला मिळेल अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली. अगस्ती सहकारी साखर कारखाना गतवर्षी गाळप झालेल्या उसाला कोणत्याही प्रकारची कपात न करता २ हजार ३५० रुपये भाव देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. ऊस भावासाठी तसेच शेतकऱ्यांच्या अन्य आंदोलनात भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अगस्ती कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कारखाना कार्यस्थळावर पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ते म्हणाले, प्रवरा पात्रातील प्रोफाईल वॉलला लाभक्षेत्रातील काही जणांनी न्यायालयात  आव्हान दिले आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी घाटघर प्रकल्पातून भंडारदरा धरणात खेचून घेण्यात येत आहे. हे पाणी तालुक्याच्या हक्काचे असून त्यातुनच प्रोफाईल वॉलसाठी पाणी उपलब्ध होणार आहे असे पिचड म्हणाले.
शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रंगनाथ मालुंजकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या भाषणाचा संदर्भ देत पिचड यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीचा मान राखत एक पैशाचीही कपात न करता २ हजार ३५० रुपये अंतिम भाव देण्याची घोषणा केली.
युवा कार्यकर्ते महेश नवले यांनी प्रदीर्घ भाषणात अहवालाचा संदर्भ देत विविध प्रश्न उपस्थित केले, मात्र पिचड यांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत कडक शब्दात त्यांना विषयाला सोडून न बोलण्याची समज दिली. राजकीय भाषण करायचे असतील तर बाहेर सभा घेऊन भाषणे करा असे त्यांनी सुनावले.  जािलदर वाक्चौरे यांच्या भाषणाच्या वेळीही अशीच शाब्दिक चकमक झाली.

Story img Loader