दुर्बल व वंचित घटकांतील तसेच अनाथ मुलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करणाऱ्या ‘टच’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे प्रफुल्ला डहाणूकर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर, विजय आचरेकर, किशोर नादावडेकर, डॉ. गोपाळ नेने आदी मान्यवर चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘छत्रपती शिवाजी महाराज कला दालना’त येत्या १२ व १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून उभी राहणारी सर्व रक्कम देशभर ठिकठिकाणी ‘टच’तर्फे चालणाऱ्या विविध प्रकल्पातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली जाणार आहे.
ज्या मुलांना शिक्षण घेण्याची संधीच उपलब्ध नाही, घरच्या परिस्थितीमुळे ते शक्य नाही अथवा आर्थिक क्षमता नाही अशा देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध सोयी मिळवून देण्याचे काम ‘टच’ (टर्निग अ‍ॅपॉच्र्युनिटीज् फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प) या संस्थेतर्फे केले जाते. विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील अनेक ठिकाणच्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत ‘टच’तर्फे मदत पुरवली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी मान्यवरांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद देऊन आपली सामाजिक बांधीलकी जपावी, असे आवाहन ‘टच’तर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी २८९८२२४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Story img Loader