शहरातील स्वच्छता सुविधांचा विकास करण्यासाठी ‘विकेंद्रित सांडपाणी प्रक्रियाकरण’ हाच एक टिकावू उपाय आहे. याबाबत जागृतीसाठी विविध स्वयंसेवी संस्था, पर्यावरण तज्ज्ञ, स्वच्छतेविषयक तज्ज्ञ आणि केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने पावले उचलली आहेत.
सांडपाणी व्यवस्थापनासाठी असलेली व्यवस्था अपुरी व कुचकामी ठरत असून हे एक मोठे आव्हान आहे. यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीवर कोटय़वधी रुपयांचा खर्च होत आहे. मलजल वाहिन्यांचे जाळेही अपुरे असल्यामुळे शहर व शहराजवळील वसाहतींच्या सांडपाण्याचे प्रश्न सोडविणे कठीण जात आहे. यामुळे शहरी वसाहतींना योग्य स्वच्छता सुविधांचा पुरवठा होऊ शकत नाही. शहरातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविनाच स्वच्छ पाणी असलेल्या नद्यांना जोडले जात असल्यामुळे पर्यावरणविषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या कारणांमुळेच परवडणाऱ्या व सुलभ अशा सांडपाणी प्रक्रियाकरणाची गरज भासू लागली आहे.
विकेंद्रित सांडपाणी प्रक्रियाकरण हे एक सुलभ तंत्र आहे. त्याचा पुन्हा वापर करता येतो. विकेंद्रिकरणामुळे स्थानिक भागीदारांचा नियोजनात व निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविता येतो. सांडपाणी व्यवस्थापन जागृतीसाठी इंटरनशनल वॉटर असोसिएशन (आयडब्ल्यूए), ब्रेमेन ओव्हसीज रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी (बीओआरडीए), केन्सोराशियम फॉर डिव्ॉट्स डिसेमिनेशन सोसायटी (सीडीडीएस), नॅशनल एन्व्हारॉनमेंटल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी आणि शहर विकास मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आशिया खंडातील ‘विकेंद्रित सांडपाणी व्यवस्थापन : व्यापक स्वरूपात शहरी स्वच्छतेच्या आव्हानांची पूर्तता’ या विषयावर नागपुरात हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेव्दारे आशिया खंडात कार्यान्वित केलेल्या प्रकल्पांतून उपयुक्त उपाययोजना निश्चित केल्या जातील. आर्थिक, संस्थात्मक, तांत्रिक व सामाजित प्रश्नही विचारात घेतले जाणार असून पर्यावरण तज्ज्ञ विचार मांडणार आहेत.
तीन दिवसीय परिषदेच्या उद््घाटन कार्यक्रमाला केन्सोराशियम फॉर डिव्ॉट्स डिसेमिनेशन सोसायटीच्या संचालक सुस्मिता सिन्हा व दक्षिण आफ्रिकेतील प्रा. क्रिस ब्रकले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘नीरी’ व ‘आयवा’चे संचालक परिषदेत सहभागी होणार आहेत. नीरी व सीडीडीतर्फे नागपुरात राबविण्यात येत असलेल्या डिव्ॉट्सच्या प्रकल्पांना भेटी देण्यात येतील. आशिया खंडात होत असलेली ही चौथी परिषद आहे. याआधी होनाई (२००८), सुरबया (२०१०) व मनिला (२०११) येथे परिषदा घेण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा