शाळेत पाहुणे येणार म्हणून सर्व विद्यार्थी तयारी करत होते.. शिक्षक पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांकडून सूचनांची उजळणी करून घेत होते.. शाळेत एके ठिकाणी नियमित वर्ग सुरू होते तर दुसरीकडे विद्यार्थी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. समाजातील वंचित घटकांना शिक्षण देणाऱ्या‘मुक्तांगण’मधील मंगळवारी सकाळची ही लगबग होती. ११ च्या सुमारास पाहुण्यांचे आगमन झाले आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने ते पुरते भारावून गेले. शाळेतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि कल्पकता पाहून पाहुणे चांगलेच रमले. त्यांनीही मग विद्यार्थ्यांना एका पुस्तकातील गोष्ट वाचून दाखवली. हे पाहुणे होते ब्रिटनचे
उपपंतप्रधान निक क्लेग. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या क्लेग यांनी सोमवारी मुक्तांगणला भेट दिली. या भेटीत त्यांनी शाळेच्या कार्याची इत्थंभूत माहिती घेतली आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना एक गोष्टही वाचून दाखवली. पाहुण्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक सिडनी फुटाडरे यांनी तयार केलेले आणि संगीतबद्ध केलेले गाणे विद्यार्थ्यांनी सादर केले. या गाण्याला क्लेग यांनी टाळय़ा वाजवून दाद दिली.
क्लेग यांनी बालवाडीलाही भेट दिली. या वर्गातील विविध शैक्षणिक साहित्य आणि वर्गाचे दिवसभराचे कामकाज कसे चालते याची माहिती त्यांनी घेतली. या चिमुकल्या मुलांनीही पाहुण्यांसमोर गाणे सादर केले. क्लेग यांनी चौथीच्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्यांना ‘बुडीज स्टोरी ऑन वॉटर’ ही छोटेखानी गोष्टही वाचून दाखविली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि शिक्षकांशीही संवाद साधला. शाळेतील शिकविण्याची पद्धत खूप वेगळी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. शाळेतील १२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे प्रमाणही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमुद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा