सामाजिक कार्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा आणि अनाथ मुलांना सनाथ कुटुंब देण्यासाठी कार्यरत असणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला भेट देऊन आलेले अनुभव यांची मांडणी केली.
या संवाद सत्राचे प्रास्ताविक विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी केले. नीलिमा मिश्रा यांनी शिक्षण घेताना अंगीकारलेल्या व्रताची गरज शहरापेक्षा गावामध्ये जास्त आहे याची जाणीव होती, असे सांगितले. गावामधील लोकांचं जगणं बदलायचं होतं. गावामध्ये रुजलेली गरिबी संपू शकते, हलाखीच्या परिस्थितीने वाकलेला पाठीचा कणा ताठ राहू शकतो हे त्यांना मला दाखवून द्यायचं होतं, म्हणूनच गावातल्या महिलांना सबलीकरणाचा मार्ग दाखविण्याचे ठरवले. शेतकऱ्यांना एकत्र आणलं. सातत्याने एक पीक घेतल्याने जैवविविधतेचा ऱ्हास झाला असल्याचे अभ्यासातून लक्षात आले. महागडय़ा रासायनिक खतांच्या वापराने नुकसानीत भरच पडत होती. त्यामुळेच त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देताना बहुपीक, आंतरपीक पद्धती आणि सेंद्रिय शेती यांचे महत्त्व पटवून देण्यावर भर दिला. त्यातूनच आर्थिक, सामाजिक व मानसिक स्तरावरही चमत्कार वाटावा असा बदल त्यांच्यात घडवून आणला, असे अनुभवाचे बोल मिश्रा यांनी ऐकविले.
अनाथपणाचे चटके सोसलेले डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आयुष्यात केवळ पैसा आणि माणुसकी या दोन गोष्टींचा मुख्य आधार लागतो, असे सांगितले. रिमांड होममध्ये गेलेले बालपण आणि तिथून बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा अनाथ म्हणून जगावे लागणार याची जाणीव झाल्यावर जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षकाची नोकरी करीत असतानाच पीएचडी केली. रिमांड होममध्येच काम करून त्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलायचा. प्रत्येक जिल्ह्यात मुलांबरोबरच मुलींचेही रिमांड होम स्थापन करून त्याची रूपरेषा बदलली. रिमांड होम तुरुंग न वाटता मुलांना घर वाटावे म्हणून गणवेश बदलला. कौटुंबिक विकास साधताना अनाथ मुलांची सनाथ घरे उभारली. तुटणारी नाती जोडण्याचे काम करण्याचे ध्येयच आता आयुष्य बनले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले.

Story img Loader