विज महावितरण कंपनीकडे विजजोडणी मिळण्यासाठी कळंबोली येथील नीलसिद्धी अमेरांत गृहप्रकल्पामधील सदनिकाधारकांनी शुक्रवारी सुरु केलेले आमरणाच्या उपोषण आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. महावितरणचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढले किंवा सदनिकाधारकांसोबत स्वताहा उपोषणाला बसेन असे आश्वासन त्यांनी सदनिकाधारकांना दिले आहे.  
सदनिकाधारकांच्या मागण्या समजून घेऊन आमदार ठाकूर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता सतिष करपे यांच्याशी संपर्क साधला. या सदनिकाधारकांची मागणी पुर्ण करा अन्यथा स्वताहा सहभागी होत पुन्हा उपोषण सुरु केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता करपे यांना दिल्याने महावितरणला आता तरी जाग येईल असा विश्वास सदनिकाधारक कल्पेश वैद्य यांनी व्यक्त केला आहे. शेकापाचे बाळाराम पाटील यांनीही उपोषण ठिकाणी भेट देऊन आपलाही पाठींबा या आंदोलनाला असल्याचे जाहीर केले. तसेच शिवसेनेचे पनवेलमधील ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर सोमण यांनी ग्राहक मंचाच्या माध्यमातून सदनिकाधारकांचे दुखणे मुख्य अभियंता करपे यांच्यापर्यंत पोहचवल्याचे सांगितले.
लवकरच विज जोडणी देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील असे आश्वासन करपे यांनी दिल्याचे सोमण यांनी सांगितले आहे. मात्र सदनिकाधारकांना लवकर विज जोडणी न मिळाल्यास विजेअभावी आर्थिक यातना भोगत असलेल्या सदनिकाधारकांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा सोमण यांनी दिला. या उपोषणामुळे सदनिकाधारकांना विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून पाठींबा मिळाला.
मात्र पोलीस वगळता उपोषण मागे घ्या अशी शुल्लक विनंती महावितरण कंपनीकडून करणारे कोणतेही अधिकारी शुक्रवारी त्या ठिकाणी फिरकले नव्हते. त्यामुळे सर्वानीच महावितरण कंपनीच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

Story img Loader