न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर जिल्ह्य़ातील निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडीपासून अजून ७५ ते ७८ किलोमीटर दूरच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. दरम्यान धरणातून पाणी सोडण्याचा वेग काहीसा मंदावल्याचेही सांगण्यात आले. निळवंडेतून १ हजार ७३८ क्युसेक प्रतिसेकंद या वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आता १ हजार ६०० क्युसेक प्रतिसेकंद एवढा कमी झाला आहे. किती पाणी सोडले व किती पोहोचेल सांगता येत नाही. तथापि ५ किंवा ६ मेपर्यंत पाणी येऊ शकेल असे, अधिकारी सांगतात.
जायकवाडी धरणात पुरेसे पाणी सोडा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यानंतर निळवंडे व मुळा धरणांमधून पाणी सोडण्यात आले. तथापि नाशिक जिल्ह्य़ातील धरणातून मात्र अजून पाणी सोडण्यात आले नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात कशी व कोणती कागदपत्रे सादर करायची याची तयारी जलसंपदा विभागातील अधिकारी गुरुवारी दिवसभर करीत होते.
दरम्यान, जायकवाडी जलाशयातून औरंगाबाद शहरास होणारा पाणीपुरवठा ३१ जुलैपर्यंत सुरू राहावा व त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता याव्यात, याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी जायकवाडीची पाहणी केली. जायकवाडी जलाशयातून सध्या मोठय़ा प्रमाणात गाळ उपसणे सुरू आहे. तसेच बाष्पीभवन कमी करता यावे, यासाठी वेगळी यंत्रणाही उभारण्यात येत आहे.
‘निळवंडे’चे पाणी अजून दूरच !
न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर जिल्ह्य़ातील निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले पाणी जायकवाडीपासून अजून ७५ ते ७८ किलोमीटर दूरच असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
First published on: 03-05-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilvande dam water is so far