अनंत अडचणींवर मात करत निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. या वर्षी धरणात सव्वापाच टीएमसी पाणी साठा राहील. दोन्ही कालव्यांची कालवेही प्रगतिपथावर आहेत. सीडब्ल्यूसी योजनेंतर्गत केंद्र सरकारचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दोन्ही कालव्यांसहित धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
तालुक्यातील गणेशवाडी येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील बोगदा थोरात यांच्या हस्ते आज खुला करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, थोरात कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष आर. बी. राहणे, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, प. स. सभापती सुरेखा मोरे आदी यावेळी उपस्थित होते. सुमारे ३०० मीटर लांबीच्या बोगद्याची पाहणी केल्यानंतर थोरात यांच्या हस्ते शेवटचा ब्लास्ट करण्यात येऊन बोगदा आरपार खुला झाला.
याप्रसंगी थोरात म्हणाले की, निळवंडेच्या कामात अनंत अडचणी आल्या. मात्र हे धरण व्हावे ही नियतीचीच इच्छा असल्याने अडचणीतून मार्ग निघत गेले. भाऊसाहेब थोरात आमदार असतांना मोठय़ा प्रयत्नातून त्यांनी उजव्या कालव्याचे काम मंजूर करुन घेतले होते. या धरणाच्या कामासाठी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांचे सर्वात मोठे सहकार्य लाभले. प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. आधी पुनर्वसन मग धरण ही संकल्पना येथे प्रत्यक्षात आणण्यात आली. यातही अनेकांनी अडथळे आणले. धरणग्रस्तांना नोक-या देताना आपण त्यांना चांगले काम दिले. मात्र इतरांनी त्यांना केवळ फरशा पुसायला लावल्या. पाटबंधारे मंत्रिपदाच्या पहिल्या दिवसापासून आपण निळवंडेच्या कामाला प्राधान्य दिले. आता ते पूर्णत्वास जात असताना होत असलेला आनंद वेगळाच असल्याचे ते म्हणाले.
कानवडे, लहानभाऊ गुंजाळ, अण्णासाहेब नवले आदींची या वेळी भाषणे झाली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नारायण साबळे यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडख यांनी सूत्रसंचालन तर कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांनी आभार मानले.
इतरांची पोटदुखी…
प्रवरा नदीपात्रात प्रोफाईल वॉल बांधण्याचा निर्णय झालेला आहे. यातून पिण्याच्या पाण्यासाठी आपला काहीअंशी फायदा होणार आहे. मात्र त्यामुळे इतरांची पोट दुखत आहे. आपण केलेल्या त्यागाची जाणीव त्यांना नसून निव्वळ खोडय़ा करण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा